For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परिवहनच्या नवीन बसेसचे लोकार्पण

10:52 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
परिवहनच्या नवीन बसेसचे लोकार्पण
Advertisement

परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांच्या उपस्थितीत बसचालक-वाहकांचा गौरव

Advertisement

बेळगाव : राज्यात नवीन बस खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी दोन हजारहून अधिक बसचालक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावर भरती केली जाणार आहे. नवीन बस खरेदीसाठी अनुदान उपलब्ध झाले असून याबाबत मंत्री मंडळात सविस्तर चर्चा झाली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी दिली. वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन मंडळाच्या नवीन बसचा लोकापर्ण सोहळा, बसचालकांचा गौरव समारंभ आणि हारूगेरी नवीन बसस्थानकाचा उद्घाटन सोहळा असा संयुक्त कार्यक्रम रविवारी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात पार पडला. यावेळी मंत्री रामलिंगारेड्डी बोलत होते. अध्यक्षस्थानी उत्तरचे आमदार राजू सेठ होते. व्यासपीठावर महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू कागे, अशोक पट्टण, बाबासाहेब पाटील, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भिमाशंकर गुळेद, हुबळी व्यवस्थापकीय संचालक एस. भरत आदी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, ग्रामीण भागातील बससेवा अधिक बळकट करण्यासाठी परिवहन अधिक प्रयत्नशील आहे. बस वाहतुक सुरळीत करण्यासाठी येत्या तीन महिन्यात जादा बस कार्यान्वित करणार आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बसचालक आणि बसवाहकांच्या वारसांना 50 लाखांची भरपाई दिली जाते. ही भरपाईची रक्कम आता 1 कोटींपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. असेही ते म्हणाले.

शक्ती योजना यशस्वी

Advertisement

राज्यातील सर्व महिलांसाठी शक्ती योजनेअंतर्गत मोफत प्रवास दिला जात आहे. ही योजना राज्यात यशस्वी झाली आहे. सार्वजनिक प्रवाशांच्या मागणीनुसार शहरी आणि भागात नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. असेही रामलिंगरेड्डी म्हणाले. प्रारंभी हुबळी व्यवस्थापकीय संचालक भरत एस यांनी प्रास्ताविक करताना बससेवेचा आढावा घेतला. बेळगाव आगारात दाखल झालेल्या नवीन बसेसना मंत्री रामलिंगरेड्डी व इतर मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून चालना देण्यात आली. तसेच 5 वर्षात अपघातमुक्त बस चालविणाऱ्या 38 बस चालकांचा रौप्यपदक व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री म्हणाल्या, सरकारने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजना यशस्वी केल्या आहेत. सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर  अधिक भर दिला आहे. थंडी, ऊन, पाऊस, याची तमा न बाळगता बसचालक व वाहक सेवा देतात, याचे कार्य कौतुकास्पद आहे. असेही त्या म्हणाल्या, परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व आमदार राजू कागे म्हणाले, दैनंदिन 5 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करू लागले आहेत. त्यामध्ये 61 टक्के महिला प्रवाशांचा समावेश आहे. बससेवेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. यासाठी येत्या काळात पुन्हा नवीन बस उपलब्ध केल्या जाणार आहेत. विशेषत: बसस्थानकामध्ये स्वच्छता, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यावेळी आमदार राजू सेठ यांनीही मनोगत व्यक्त केले.

बेळगाव परिवहनच्या ताफ्यात 50 नवीन बस

बेळगाव आगाराला नवीन 50 बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे काही अंशी बस कमतरतेचा प्रश्न मार्गी लागला आहे. दाखल झालेल्या नवीन बस लांब पल्ल्यासाठी व शहराअंतर्गत वाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. याप्रसंगी परिवहनचे विभागीय संचालक गणेश राठोड, डीटीओ के. के लमाणीसह वाहतूक नियंत्रक, बसचालक, वाहक व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.