पंजाबमधील हलवारा विमानतळाचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन: पंजाबला मिळाले सातवे विमानतळ
चंदीगढ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंजाबमधील लुधियाना येथील हलवारा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालंधर येथून व्हर्च्युअल माध्यमातून या विमानळाचे लोकार्पण केले आहे. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आदी उपस्थित होते. पंजाबमध्ये या पूर्वी श्री गुरु रामदास जी विमानतळ अमृतसर, शहीद भगतसिंग विमानतळ मोहाली (चंदीगड), आदमपूर विमानतळ, बठिंडा विमानतळ, पठाणकोट विमानतळ, सहनेवाल विमानतळ लुधियाना यासह 6 विमानतळ होते.आता हलवारा विमानतळाच्या माध्यमातून पंजाबला सातवे विमानतळ मिळाले आहे.
हलवारा विमानतळ बनवण्यासाठी बीज कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री असताना प्रारंभ केला होता. यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी त्याचे बांधकाम सुरू केले आणि आता भगवंत मान यांनी ते उड्डाणासाठी तयार केले. हलवारा विमानतळ तयार करण्यासाठी 7 वर्षे लागली. जमीन अधिग्रहणापासून ते विमानतळ सुरू करण्यापर्यंत प्रशासनाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. प्रशासनाने वेगवेगळ्या पातळ्यांवर समस्या सोडवून हे विमानतळ तयार करण्यात आले आहे.
विमानतळाला नवी ओळख मिळणार
संत रविदासांच्या जयंतीनिमित्त पंजाबमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक मोठी घोषणा केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आदमपूर विमानतळाचे नाव संत रविदासजींच्या नावावर ठेवण्यात आले आहे. पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की, माझे नाते काशीचे जन्मस्थान असलेल्या श्री गुरु रविदासजींशी आहे. काशीच्या लोकांनी मला आशीर्वाद दिला आणि खासदार म्हणून काशीची सेवा करण्याचे भाग्यही मला मिळाले,असे ही ते म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत नवीन ऊर्जा भरण्यासाठी आणखी एक ऐतिहासिक काम करण्यात आले आहे. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये व्यापार करार झाला आहे. आज जगाच्या सर्व भागात त्याची व्यापक चर्चा आहे. या व्यापार करारानंतर युरोपातील 27 देशांशी आमचा व्यापार भरभराटीला येईल.
संत रविदासांना अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी डेरा सचखंड बल्ला यांचे आभार मानतो. आज माघ पौर्णिमेची पवित्र तारीख आहे. श्री गुरु रविदासजींच्या 649 व्या जयंतीचा पवित्र प्रसंग आहे. या पवित्र प्रसंगी, आज मला तुम्हा सर्वांमध्ये येण्याचे भाग्य लाभले आहे. या पवित्र व्यासपीठावरून मी श्री गुरु रविदासजींना वंदन करतो आणि तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासीयांना संत रविदास जयंती आणि माघ पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
लुधियानातील साहनेवाल विमानतळावरून उड्डाणे सुरू करण्यात अडचण येत होती, ज्यामुळे लुधियानामध्ये नवीन विमानतळ बांधण्याची मागणी करण्यात आली. आदमपूरमधील विमानतळ बांधल्यानंतर, लुधियानाच्या व्यावसायिकांनी हलवारा येथे विमानतळ बांधण्याची मागणी केली. 2018 मध्ये ते मंजूर झाले आणि 2026 मध्ये त्यांची बांधणी पूर्ण करण्यात आली.
1 मार्चपासून होणार उड्डाणे
कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा म्हणाले की, 1 मार्चपासून लुधियाना आणि दिल्ली दरम्यान उड्डाणे सुरू होतील. दिल्ली लुधियाना आणि दिल्ली दरम्यान 2 उड्डाणे सुरू होतील. त्यानंतर मागणी वाढल्याने इतर शहरांमध्ये उड्डाणे सुरू करण्यात येणार आहेत.