कारवारमधील लढाऊ विमान संग्रहालयाचे लोकार्पण
पर्यटकांना संग्रहालयाला भेट देण्याची संधी न दिल्याने नाराजीचा सूर
कारवार : येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावरील बहुचर्चीत व आकर्षणाचा केंद्र बनून राहिलेल्या लढाऊ विमान संग्रहालयाचे शनिवारी आमदार सतीश सैल यांच्या हस्ते 8 ते 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उद्घाटन करण्यात आले. तथापि लढाऊ विमानप्रेमींना आणि पर्यटकांना संग्रहालयाला भेट देण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे संग्रहालयप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून, संग्रहालयाला भेट देण्याची संधीच द्यायची नव्हती तर उद्घाटन का करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काही वर्षापूर्वी येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौसेनेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या आय.एन.एस. चपळ युद्धनौका संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे. चपळ युद्धनौका संग्रहालयाच्या सानिध्यात लढाऊ विमान संग्रहालय उभारण्याचा निर्णय काही वर्षापूर्वी घेण्यात आला. त्यानुसार भारतीय नौसेनेच्या सेवेतून 2017 मध्ये निवृत्त झालेले आणि तामिळनाडूतील राजोली नौसेना तळावर विश्रांती घेत असलेले टुपोलोव (1424) हे लढाऊ विमान येथे आणण्याचे निश्चित करण्यात आले.
तथापि कोरोनामुळे लढाऊ विमान येथे आणण्याचा कार्यक्रम लांबणीवर पडला. शेवटी 53.6 मीटर लांब आणि 35 मीटर रुंद असलेल्या टुपोलोव लढाऊ विमानाचे सुटे भाग करण्यात आले आणि सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून विमानाचे सुटे भाग येथील समुद्र किनाऱ्यावर गेल्या सप्टेंबर (2023) मध्ये आणले गेले. गेल्या ऑक्टोबरमध्येच सुटे भाग जोडून लढाऊ विमान संग्रहालयासाठी सज्ज करण्यात आले. लढाऊ विमानाची जोडणी झाली पण पर्यटकांना संग्रहालयाला भेट देण्याची परवानगी देण्यात आली नाही.
त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचा उद्देश सफल झाला नाही. परिणामी येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल होणाऱ्या राज्यासह अन्य राज्यातील पर्यटकांकडून लढाऊ विमान संग्रहालय पर्यटकांसाठी खुले कधी केले जाणार, असे विचारले जाऊ लागले. दरम्यान, शनिवारी कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांच्या हस्ते लढाऊ विमान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर, पर्यटन खात्याचे उपसंचालक एच. व्ही. जयंत उपस्थित होते. तथापि संग्रहालयाचे उद्घाटन होऊनही संग्रहालयप्रेमी किंवा पर्यटकांना औत्सुक्याचे केंद्र बनून राहिलेल्या संग्रहालयाला भेट देण्याची पारवानगी देण्यात आली. त्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.
परिसराचा विकास होणे आवश्यक
लढाऊ विमान संग्रहालयाच्या आजूबाजूला उद्यान, कॅन्टीन आदी सुविधा विकसीत करणे गरजेचे आहे. यासाठी सुमारे 2 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी थोडीच रक्कम खर्च करण्यात आली. उरलेली रक्कम खर्च करून अपेक्षित सुविधा उभारण्यासाठी काही महिन्यांची गरज आहे. त्यामुळे सुसज्जीत संग्रहालय सज्ज होण्यासाठी आणखीन किमान 5-6 महिन्यांची गरज आहे. त्यामुळे पर्यटकांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.