आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल; लोअर परळ पूलाचे बेकायदेशीर उद्घाटन केल्याचा आरोप
लोअर परळ येथील उड्डाण पुलावरील दक्षिण दक्षिण दिशेला जाणारा रस्त्याचे उद्घाटन करून वाहतुकीसाठी बेकायदेशीररित्या खुली केल्याचा आरोप ठेऊन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून अजून ते पुर्ण झाले नाही असा प्रशासनाने दावा केला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे, यांच्याबरोबर विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर या प्रमुख नेत्यांवरही गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई महानगरपालिकेने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री यासंदर्भातील तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आज पहाटे आदित्य ठाकरेंसह इतर शिवसेना आमदार आणि नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला गेला आहे.
वरळी येथील ना. म. जोशी मार्गावरील लोअर परळ पूल काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या या पुलाचे काम रखडल्याने लोअर परळ आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडीने ग्रासले होते. पुलाचे इतर काम चालू असून पथदिवे किंवा इतर सूचना अशी कामे करूनच उद्घाटन करण्याचे महापालिकेने योजिले होते. या साठी पुलावर बॅरेकेट्स लाऊन रस्ता वाहतूकीसाठी बंद केला होता.
गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार सुनिल शिंदे, सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांनी रस्ता रोधक हटवून, नारळ फोडून लोअर परेळ येथील पुल वाहतूकीस खुला केला. त्यानंतर मुंबई महानगर पालीकेचे दुय्यम अभियंता पुरषोत्तम इंगळे यांनी यांनी रस्त्याचे काम अजून पुर्ण झाले नसून त्याची चाचपणीही झाली नाही तरीही अनधिकृतरित्या उद्धाटन केल्याची तक्रार दिली होती त्यानुसार आज गुन्हा दाखल झाला.