विरोधकांच्या सभात्यागात
व्हीबी-जी राम जी विरोधातील ठराव संमत :विशेष अधिवेशन अनिश्चित कालावधीसाठी तहकूब
प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्र सरकारने जारी केलेला व्हीबी-जी राम जी कायदा रद्द करण्याचा आणि युपीए सरकारच्या कार्यकाळातील मनरेगा योजना पुन्हा जारी करण्याच्या मागणीचा ठराव बुधवारी विधानसभेत विरोधी पक्षांच्या तीव्र विरोधात संमत करण्यात आला. विरोधी पक्षातील आमदारांनी राज्य सरकारच्या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवत सभात्याग केला. भाजप व निजद आमदारांच्या अनुपस्थितीत ठराव संमत करण्यात आला. त्यानंतर सभाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित कालावधीसाठी तहकूब केले.
केंद्र सरकारने जारी केलेल्या व्हीबी-जी राम जी कायद्याविरुद्ध ठराव संमत करण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. त्यावर चर्चा करण्यासाठी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस राखून ठेवण्यात आले. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ठराव मांडला होता.
कर्नाटकातील ग्रामीण जनतेच्या जगण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी हे सभागृह केंद्र सरकारला रोजगार आणि उपजीविका मिशन (ग्रामीण) (व्हीबी-जी राम जी) कायदा तत्काळ रद्द करण्याची विनंती करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. व्हीबी-जी राम जी कायदा संघराज्य तत्वाच्या विरुद्ध आहे. हा राज्याच्या तिजोरीवर एक मोठा भार आहे तसेच विकेंद्रीकरणाच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे. ग्रामपंचायतींचे अधिकार हिरावून घेतले आहेत. त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती.
अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षातील आमदारांनी मंगळवारी रात्री हाती घेतलेले धरणे बुधवारी देखील सुरू होते. विरोधकांच्या आंदोलनादरम्यान व्हीबी-जी राम जी रद्द करण्याचा आणि मनरेगा पुन्हा जारी करण्याच्या मागणीच्या ठरावावर बुधवारी विधानसभेत पुढील चर्चा सुरू राहिली. राज्य सरकारने केंद्राच्या व्हीबी-जी राम जी कायद्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर भाजप आणि निजदच्या आमदारांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला.
सत्ताधारी काँग्रेसने मांडलेल्या ठरावाला भाजप विरोध करत असून व्हीबी-जी रामजी कायद्याला पाठिंबा देत असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक सांगितले. तसेच अबकारी खात्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्या राजीनाम्याची मागणी व राज्य सरकारच्या ठरावाविरुद्ध घोषणाबाजी करत विरोधी आमदारांनी त्यांनी मागणी करत विरोधी आमदारांनी सभात्याग केला.
त्यानंतर सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी, व्हीबी-जी राम जीविरुद्धचा ठराव विरोधी आमदारांच्या अनुपस्थितीत संमत करण्यात आल्याचे सांगत कामकाज अनिश्चित कालावधीसाठी तहकूब केले.