दक्षिण गोवा जि.पं.निवडणुकीत विरोधकांचे फुटले एक मत
भाजपला 15 ऐवजी पडली 16 मते
पणजी : जिल्हा पंचायतीच्या 50 जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकहाती यश प्राप्त केलेल्या भारतीय जनता पक्षाने मंगळवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी स्वपक्षाचेच सदस्य नियुक्त करून दोन्ही जिल्हा पंचायतींवर झेंडा फडकवला. त्यात उत्तर गोवा अध्यक्षपदी रेश्मा बांदोडकर (रेईश मागूश) आणि उपाध्यक्षपदी नामदेव च्यारी (होंडा) तर दक्षिण गोवा अध्यक्षपदी सिद्धार्थ गावस देसाई (शेल्डे) आणि उपाध्यक्षपदी अंजली वेळीप (बार्शे) यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचा कार्यभार स्वीकारला. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज बुधवार दि. 31 रोजी पर्वरी येथील सचिवालयाच्या परिषदगृहात सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
भाजपची बी टीम कोण?
उत्तर गोव्यातील दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर दक्षिणेत मात्र निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड झाली. तरीही मतमोजणीवेळी तेथे एका विरोधकाचे मत फुटल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तो फुटीर सदस्य कोण यावरून सदस्यांमध्येच गंभीर चर्चा सुरू राहिली. त्यातून काँग्रेस, आप व गोवा फॉरवर्डच्या सदस्यांमध्ये एकमेकांकडे संशयाने पाहण्यात व त्यातून भाजपची खरी बी-टीम कोण? यावरून झालेले दोषारोप व चर्वण सुरु होते.
दक्षिण गोव्यात विरोधी आघाडीकडे 10 सदस्यांचे संख्याबळ होते. भाजपच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना 15 मते मिळणे क्रमप्राप्त होते. तरीही दोन्हाr पदांसाठी भाजपला 16 मते मिळाली. विरोधी उमेदवारांना 9 मते मिळाली. यावरून आधी अचंबित झालेल्या विरोधकांनी नंतर संशय आणि दोषारोप सुरू केले. या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी काँग्रेस उमेदवार लुईसा रॉड्रिग्स आणि उपाध्यक्षपदासाठी फॉरवर्डच्या इनासिया पिंटो यांनी अर्ज सादर केले होते. त्यांना प्रत्येकी 9 मते मिळाली.
भाजप, मगोकडून अभिनंदन-शुभेच्छा
दोन्ही जिल्हा पंचायतींवर निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे भाजपने अभिनंदन केले आहे. त्यांनी आपला कार्यकाळ जनतेची सेवा आणि कल्याणासाठी समर्पित करावा, असे आवाहन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर मगो पक्षानेही या दोन्ही जिल्हा पंचायतींच्या स्थापनेसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा व्यक्त केल्या.