दुसऱ्या सत्रात शेअरबाजारात परतली तेजी
सेन्सेक्स 275 अंकांनी वधारला : बँकिंग व ऊर्जा क्षेत्र मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारले आहेत. यामध्ये अगोदरच्या दिवशी म्हणजे सोमवारी आठवड्याच्या प्रारंभी बाजारात घसरण राहिली होती. मंगळवारच्या सत्रात मात्र बाजाराने दिलासा दिला आहे. यावेळी सेन्सेक्सने 66 हजारांची नवी उंची प्राप्त केली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 275.62 अंकांनी वधारुन निर्देशांक 65,930.77 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 89.40 अंकांनी वधारुन निर्देशांक 19,783.40 वर बंद झाला आहे.
अमेरिकेतील बँक फेडरल रिझर्व्हने आपल्या व्याजदरात वाढ करण्याची सध्यातरी कोणतीही शक्यता नसल्याचे म्हटले आहे. यामुळे आशियातील बाजारांमधील तेजीच्या वातावरणामुळे याचा लाभ हा भारतीय बाजाराला झाला असल्याचे मंगळवारी दिसून आले.
या दरम्यान धातू, बँकिंग आणि ऊर्जा या क्षेत्रातील समभागांमधील खरेदीसोबत अमेरिकन बजारातील तेजीचा कल राहिल्याचा फायदा बाजाराला झाला आहे. सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक 0.50 टक्क्यांनी वधारले आहेत.
प्रमुख कंपन्यांमध्ये जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग 1.76 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह टायटन, टाटा स्टील, सनफार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, टाटा मोर्ट्स आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीत राहिले. तसेच अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास एनटीपीसी, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, भारतीय स्sटट बँक आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग हे प्रभावीत होत बंद झाले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारच्या सत्रात जवळपास 645.72 कोटी रुपये इतक्या किंमतीचे समभाग विक्री केले आहेत. जागतिक पातळीवरील सकारात्मक कल राहिल्यास याचा लाभ हा आगामी काळात बाजाराला होणार आहे.