दुसऱ्या सत्रामध्ये दोन्ही निर्देशांकांची नवी भरारी
सेन्सेक्स 712 अंकांवर मजबूत : निफ्टी 23,700 अंकांच्या विक्रमी टप्प्यावर
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांच्या निर्देशांकांनी विक्रमी कामगिरी केली आहे. यामध्ये आशियातील बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिल्याचा लाभ भारतीय बाजाराला झाला आहे. दरम्यान ब्लू-चिप बँकेचे समभाग व रिलायन्समधील खरेदीच्या कारणास्तव सेन्सेक्स तब्बल 78,000 च्या टप्प्यावर कार्यरत राहिल्याने निर्देशांकांने बाजारात नवी भरारी घेतल्याचे दिसून आले.
बीएसई सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 712.44 अंकांनी निर्देशांक मजबतूत होत 0.92 टक्क्यांसोबत तो 78,053.52 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 183.45 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 23,721.30 वर बंद झाला आहे.
मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 15 समभाग हे वधारले आहेत. यामध्ये अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे निर्देशांक हे पहिल्या पाचमध्ये अव्वल राहिले आहेत. यासह स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, एचसीएल टेक, इंडसइंड बँक आणि सनफार्मा यांचे समभाग हे तेजीसह बंद झाले.
अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिड कॉर्प, टाटा स्टील, एशियन पेन्ट्स, नेस्ले इंडिया आणि मारुती सुझुकी यांचे समभाग प्रामुख्याने प्रभावीत झाले होते. तसेच एनटीपीसी, जेएसडब्लू स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोर्ट्स, अदानी पोर्ट्स, टायटन, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा , भारती एअरटेल, आयटीसी आणि बजाज फायनान्स यांचे समभाग हे नुकसानीसोबत बंद झाले.
व्याजदरांमध्ये कपात होणार असल्याच्या संकेतामुळे बँकिंग क्षेत्रातील समभागांना मंगळवारी चांगली स्थिती मिळाली आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांचे बाजारमूल्याचे आकर्षक राहिले आहे. यामुळे मोठ्या खासगी बँकांचे समभाग हे भक्कम स्थितीत राहिल्याचे दिसून आले.
जागतिक स्थिती :
आशियातील बाजारांमध्ये सियोल, टोकीओ आणि हाँगकाँग यांचे समभाग हे उच्चांकावर राहिले होते. युरोपीन बाजारांमध्ये नकारात्मक स्थिती होती. दरम्यान भारतीय बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांकडून सोमवारी 653.97 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री केली आहे. तर जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.44 टक्क्यांनी घसरुन 85.63 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.