For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतरीच्या गूढगर्भी...

06:34 AM Feb 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंतरीच्या गूढगर्भी
Advertisement

मन पाखरू पाखरू

Advertisement

त्याची काय सांगू मात

आता व्हतं भुईवर

Advertisement

गेलं गेलं आभाळात

बहिणाबाईंच्या या ओळी मनाला अक्षरश: लागू होतात. मनाच्या तळाचा ठाव लागणं समर्थांना सुद्धा शक्य झालेलं नसावं किंवा तसा तो सहजासहजी लागतही नाही हेच त्यांना सांगायचं असावं. म्हणून तर त्यांनी दासबोधात मनाविषयी सांगून ठेवलंय ना! मनाच्या श्लोकांसाठी त्यांनी इतके सगळे शब्द खर्च घातलेत, इतके सारे मनाचे श्लोक लिहिलेत, त्या अर्थी मन ही एक गूढ गोष्ट आहे हे खासच. बरं, मन या विषयावर फक्त भारतातच विचार झाला का? नाही, म्हणजे मन या विषयावर भारतीय तत्त्वज्ञानात, शास्त्रांमध्ये जेवढा विचार झाला तेवढा अन्यत्र कुठे झालेला असणं कमीच. पण एकूणच जगभरात मन या विषयावरती शेकडो शास्त्रज्ञांनी विचार केला, आपापली मतं मांडली, आपापले अनुभव शब्दबद्ध केले, पण मन बेटं ह्या सगळ्यांच्या हातातून सुटून कशी जिरवली म्हणत सुळ्ळकन बाजूलाच पळतं. लहान बाळ जसं जसं मोठं होतं तशी तशी या मनाची जडणघडण होत जाते आणि अनेक गोष्टी ते साठवून ठेवायला लागतं. आयुष्यात माणसाला सुख कमीच असतं. दु:खाचे डोंगर संपता संपत नाहीत. म्हणून की काय, असंख्य दु:खं मनाच्या तळाशी कुठल्या गाठोड्यात बांधून ठेवलेली असतात त्याचा पत्ता माणसाला लागतच नसतो. अशा कित्येक गोष्टी एखाद्या गाफिलक्षणी बाहेर पडतात.

उदाहरणार्थ नशापाणी केलेला मनुष्य जे बरळतो ते किती गमतीशीर असलं तरी बऱ्याचदा असंही आढळून येतं की नशापाणी केलेल्या मनुष्याचं आपल्या मेंदूवर आणि मनावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे मनात दडवून ठेवलेलं आणि कुणालाही न कळू शकलेलं असं बरंच सत्य तो त्या नशेत उघड करत असतो. म्हणून असंही म्हटलं जातं की ज्या माणसाला व्यसनं आहेत त्याला कायम धोका असतो. ज्याला व्यसन नाही त्याच्या तोंडून त्याच्या मनाच्या तळाशी असलेलं सत्य बाहेर काढणं हे अति अवघड काम असतं.

एकंदरीत आपल्याकडे मनोव्यापाराकडे बघण्याचा स्वच्छ आणि निकोप दृष्टिकोन विकसितच झालेला नाही असं खेदाने म्हणावे लागेल. त्यामुळे कळत्या वयापासूनच असंख्य सल, असंख्य दु:खं, अपमान, मनात दडवून ठेवत जाण्याची एक सवय आपल्याला लागलेली असते आणि जितकं वय वाढेल तितकी ही गाठोडी वाढतच जातात. एखादी वेळ अशी येते की आता ही गाठोडी ठेवायला आपल्याकडे जागाच उपलब्ध नसते आणि त्या वेळेला कुठेतरी काहीतरी निमित्त होऊन या सगळ्याचा विस्फोट होतो. मग एक जीवघेणा प्रवास सुरू होतो. कदाचित तो मनोविकाराकडे असतो, कदाचित मनोविकृतीकडे असतो किंवा कदाचित खूप मोठ्या मनोशारीरिक आजाराकडे असतो.

या सर्व घटनांमध्ये प्रामुख्याने स्त्रिया जास्त असतात. कारण लहानपणापासून त्यांना तू सगळं सहन कर, तू जमवून घे, अशी शिकवण दिली जाते. त्या सद्गुणविकृतीचा अतिरेक होतो आणि योग्य ठिकाणी आपल्याला स्वत:साठी बोलावंच लागतं. त्यात काहीही चूक नाही किंवा कुठलीही गोष्ट जर आपल्या आत्मसन्मानाच्या आणि एकंदरित जगण्याच्या दृष्टीने घातक किंवा मारक असेल तर तिचा पूर्ण ताकदीने विरोध केला पाहिजेच. तो केला नाही तर आपल्याला गृहित धरण्याची या जगातल्या प्रत्येकालाच सवय लागते, अशाप्रकारचं कोणतंही शिक्षण स्त्रियांना दिलेलंच नसतं. त्यामुळे सहन करण्याची, साठवण्याची प्रवृत्ती वाढते. समोरच्या व्यक्तींनाही त्यामुळे असं वाटतं की हे बोलणं खूपच किरकोळ आहे. तिने अॅडजस्ट करून घ्यावं. आपण विचार केला तर आपला विश्वासही बसणार नाही. पण आकडेवारीच कशाला, अगदी अनौपचारिक गोष्टी, गप्पा यामधून सुद्धा आपल्याला कळतं की कित्येक पुरुषांना बायकोवर हात उचलण्याची चटकच लागलेली असते. कारण त्यांना तो पुरुषार्थ वाटतो. त्याचप्रमाणे घरातल्या ज्येष्ठ बायकांनाही ‘उचलला पुरुषांनी हात तर काय झालं त्याच्यात एवढं?’ असं वाटत असतं. आणि शिवीगाळ ही तर सामान्यपणे घरात वापरली जात असते. अगदी उच्चशिक्षित उच्चभ्रू म्हणणारे पुरुषही इतक्या खालच्या पातळीवरची भाषा घरात वापरताना दिसतात की हे घर नक्की सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणसाचं आहे की नाही असा प्रश्न पडावा!

या सगळ्याचा सारांश असा की हे ऐकून घेणाऱ्या व्यक्तीचा, हे जग सुंदरही असू शकतं, या जगात आनंदही असू शकतो, या जगात कला असतात, सौंदर्य असतं, सुगंध असतो आणि या सगळ्या गोष्टी उपभोगासाठी असतात, याच्यावरचा विश्वासच उडून जातो. कारण कोणत्याही कलेचा आनंदाचा, सुंदर गोष्टींचा उपभोग तेव्हाच माणसाला घेता येतो जेव्हा त्याचं मन थोडं तरी शांत असतं. ही गोष्ट अत्यंत सत्य आहे, की माणसाला जेव्हा एखादी कला वश असते किंवा त्याला कलेची आवड असते तेव्हा अतिशय वाईट क्षणी, उद्वेगाच्या क्षणी ती कला त्याला तारुन नेत असते. परंतु त्या पातळीवर येण्यासाठी तरी त्याला जिथपर्यंत पोहोचावं लागतं तिथेच जर पोहचू दिलं जात नसेल, त्याचे हातच पोहोचू दिले जात नसतील तर त्याला यातलं काय आठवणार असतं, हा एक मोठा प्रश्न असतो.

या सगळ्या आठवणींच्या गाठोड्यात प्रत्येकाने एखादं असंही गाठोडं दडवलेलं असतं की एकेकाळी जगातल्या अनुभवलेल्या सर्व सुंदर गोष्टी, जगातील सर्वात सुंदर बाब म्हणजे प्रेम, जे बहुधा यशाला जात नाही, पण त्या आठवणी मागे टाकून मनुष्याला आपलं आयुष्य पुढे न्यावं लागतं अशी एखादी आठवण, गाठोड्यात बांधून अगदी तळाशी कुठेतरी फेकून दिलेली असते. ती आठवण मनात आहे याचा मनालासुद्धा पत्ता लागता कामा नये इतकी ती खोल दडवून नाहिशी केलेली असते.

परंतु अशा कितीतरी आठवणी जात्या जीवाच्या तोंडून बाहेर पडतात. त्या वेळेला त्याच्या घरातल्या माणसांना कळतं की अरेच्चा या माणसाच्या मनात या व्यक्तीविषयी प्रेम होतं किंवा असं काहीतरी होतं. तेव्हा ती व्यक्ती अनंताच्या प्रवासाला निघालेली असते किंवा निघूनही गेलेली असते. नंतर त्यामुळे अनेक प्रश्नही अनुत्तरितच राहतात. कोणतं गाठोडं कोणत्यावेळी उघडावं हे अंतर्मनाच्या हातात असतं. बाह्यमन यामध्ये काहीही करू शकत नसतं. त्यामुळे जिवंत असलेली प्रत्येक व्यक्ती फार तर एवढी इच्छा करू शकते की जे लपवायचं आहे ते मी मरेपर्यंत लपलेलं राहू देत म्हणजे झालं.

स्वप्नात पाहिले जे ते राहुदेत स्वप्नी

हे सत्य स्वप्नरंगी, मी ऐकिले सुरांनी

हे असं एखादं सुगंधी गाठोडं आयुष्यभर मनात गाडून ठेवूनच त्याच्या भरवशावर जगण्याचं बळ मिळत असतं. माणूस जाताना उरात ते घेऊन जातो आणि कधीकधी ते पुढच्या जन्मी रुजून आनंदाची फुलबाग बहरते. अंतरीच्या गूढगर्भी असलेलं हे सुरेल स्वप्न जन्मोजन्मी सोबत करतं.

-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.