अली खानजादे युवकाच्या खूनप्रकरणी
10 जणांविरुद्ध गुन्हा, चौघांना अटक
प्रतिनिधी/ मडगाव
शुक्रवारी दुपारी घोगळ-मडगाव येथे अली खानजादे या युवकाचा सुरा खुपसून खून केल्याच्या आरोपावरुन एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यातील चारजणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील अक्रम खान, शिरवडे नावेली येथील रिझवान शेख, घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील उबेद मकंदर व चौगुले कॉलेजजवळील आलम सय्यद अशी आहेत. लग्नकार्यातून गोळा केलेली देणगीची रक्कम सुपूर्द न केल्याच्या कारणावरुन खुनाचे हे प्रकरण घडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अक्रम खान व साहील उर्फ स्पायकी यांच्यावर खुनाचा आरोप आहे तर या प्रकरणातील इतर आठजणांविरुद्ध अन्य किरकोळ आरोप आहेत. या खून प्रकरणासंबंधी फातोर्डा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या 103 (1), 61, 351, 190 कलमाखाली गुन्हा नोंद केलेला आहे. या खून प्रकरणासंबंधी फातोर्डा पोलिस स्थानकाचे निरीक्षक तपास करीत आहेत. सुरा खुपसल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या अली खानजादे या युवकाला मडगावच्या जिल्हा इस्पितळात नेण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी ‘मृतावस्थेत आणले’ अशी नोंद केली.