For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौथ्या भक्तीत देव आणि भक्ताचे अद्वैत तयार होते

06:27 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
चौथ्या भक्तीत देव आणि भक्ताचे  अद्वैत तयार होते
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

कृष्णाने शक्य असेल त्या सर्वांचा उद्धार कसा केला हे सांगताना नाथमहाराज म्हणाले, कृष्ण एव्हढा ज्ञानघन होता की, त्याच्या संगतीने वृन्दावनातल्या गवताच्या पात्यांचा, रोपांचा, झाडांचाही उद्धार झाला. त्याच्या संगतीत जे होते त्यांचा तर उद्धार झालाच पण ज्यांनी त्याच्याशी वैर पत्करले त्यांचाही त्याने उद्धार केला. कृष्णाचे अनेक वैरी सतत त्याचे चिंतन करत कृष्णरूप झाले आणि त्यातूनच त्या सर्वांचा उद्धार झाला. श्रीकृष्णाने तारू होऊन भवसागरातून किती जडमूढ मंडळींचा उद्धार केला त्याला काही गणतीच नाही. त्याने मोक्षाचा उघड उघड सुकाळ केला.

ज्यांचे ज्यांचे त्याच्याशी नाते जुळले, जे जे त्याला कौतुकाने पहायला आले त्या सगळ्यांच्याकडे एक एक नेत्रकटाक्ष टाकून त्याने त्यांचा उद्धार केला. वैरी असोत वा भक्त, जो कोणी त्याचे अखंड चिंतन करेल त्याचा उद्धार हा होणारच. गोपीनी स्वत:च्या देहाचे भान विसरून त्याच्यावर प्रेम केले व त्याची अखंड संगत केल्याने त्यांचा उद्धार झाला. श्रीकृष्णाने गायींचे संरक्षण करून त्यांचा उद्धार केला. मोरांची पिसे डोक्यात खोचून त्यांचा उद्धार केला तर वृक्षाना फळाफुलांच्या घोसाचे वरदान देऊन त्यांचाही उद्धार केला. श्रीकृष्णावतार पूर्णब्रह्म असल्याने त्यांनी ज्ञानाला प्राधान्य देऊन चित्रविचित्र लीला केल्या. त्यातही त्यांनी गोकुळात घालवलेला बालपणीचा कालावधी परम पावन असल्याने सर्वांना वंद्य आहे. षड्गुणैश्वर्यसंपत्ती घेऊन श्रीकृष्णमूर्ती अवतरली होती. षड्गुणैश्वर्यसंपत्ती म्हणजे यश-श्री-औदार्य-कीर्ती ज्ञान आणि अभंग वैराग्यस्थिती होय.

Advertisement

इतर अवतारात हे सहाही गुण भगवंतांनी गुप्त ठेवले होते. कृष्णावतार मात्र परिपूर्ण ब्रह्म असल्याने सर्व सहाच्यासहा षड्गुण त्यांनी प्रकाशित केले. त्यामुळे त्यांच्या सहवासात जे जे आले ते ते सर्वजण उद्धरून गेले. कृष्णाच्या स्वभावावर भाळून कित्येकांनी त्याच्यावर त्यांच्या प्राणापलीकडे प्रेम केले त्यांचा उद्धार झाला हे निराळे सांगण्याची गरज नाही. एव्हढंच काय ज्यांनी ज्यांनी ही कृष्णकीर्ती इतरांना सांगितली त्यांचाही उद्धार झाला. असे कितीजण उद्धरून गेले त्याला गणतीच नाही. तसेच येथून पुढे जे ह्या कृष्ण्कीर्तीचा महिमा इतरांना वर्णन करून सांगतील त्यांना परमभक्तीचा लाभ होऊन त्यांचा उद्धार होईल.

ज्याला चौथी भक्ती लाभते म्हणजे ज्याचे देवाबरोबर अद्वैत तयार होते, त्याला परमहंसाची श्रीकृष्णगती प्राप्त होते. त्या भक्तीला पराभक्ती असे म्हणतात. ही चौथी भक्ती होय. आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी हे सहजस्थिती असलेले भक्त सर्वांना माहित आहेत. ते जर कृष्णकीर्ती गातील तर त्यांच्या मनामध्ये चौथी भक्ती कायम प्रकट होईल. आवडीने श्रीकृष्णाच्या कीर्तीचे महिमान सांगितल्याने त्यांना विषयांपासून विरक्ती सहजी लाभेल. ही विषयांपासूनची विरक्ती सहजी लाभणारी नव्हे परंतु श्रीकृष्ण कीर्तीचे महिमानच असे आहे की, ते सांगत असताना त्यांना विशेष काही प्रयत्न न करतादेखील विषयविरक्ती सहजी साध्य होते. एव्हढेच नव्हे तर शमदमादि संपत्ती त्यांचे पाय चुरू लागते. जो श्रीकृष्ण कीर्तीचा अखंड जप करेल त्यांच्याजवळ श्रीकृष्ण सतत राहील. ह्या चौथ्या भक्तीत पुजला जाणारा आणि पूजा करणारा श्रीकृष्णच असतो. त्यामुळे पूजा, पूजेचे विधी आणि विधान देव स्वत:च होतात. अत्तर, गंध, धूप, दीप ह्या सर्व गोष्टी कृष्णरूपच असतात. हे सर्व चौथ्या भक्तीचे लक्षण आहे. आपण स्वत:च आपले भजन करायचे हे चौथ्या भक्तीचे विंदान आहे. भोग्य आणि भोक्ता दोन्हीच श्रीकृष्णच होतो. त्यामुळे श्रीकृष्ण भक्तांपासून अर्धक्षणही वेगळा राहू शकत नाही. देव आणि भक्ताचे अद्वैत तयार होते. अशावेळी भक्त कृष्णरूप झालेला असल्याने त्याला श्रीकृष्णापेक्षा वेगळी जात, गोत नसते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.