प्रथम टप्प्यात 8 केंद्रीय मंत्री आखाड्यात
आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा प्रथम टप्पा आता अगदीच नजीक, अर्थात 24 तासांवर येऊन ठेपला आहे. बुधवारी संध्याकाळापासून या टप्प्याच्या जाहीर प्रचाराचे कार्य समाप्त झाले आहे. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून 8 केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य निर्धारित होणार आहे. याशिवाय 2 माजी मुख्यमंत्री आणि एक माजी राज्यपालही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. या टप्प्यात किती टक्के मतदान होईल, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. त्यावरुन मतदारांची मन:स्थिती लक्षात येईल. सर्वसाधारणपणे असा अनुभव आहे की, कोणत्याही मोठ्या निवडणुकीच्या प्रथम टप्प्यात जितकी मतदानाची टक्केवारी गाठली जाते, ती पुढच्या टप्प्यांमध्येही राखली जाते. कारण मतदानाचा एक कल प्रथम टप्प्यात निश्चित होतो, जो नंतरच्या टप्प्यांमध्येही पुढे सुरु राहतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात एकंदर 68.12 टक्के मतदान झाले होते. जे, आजवरच्या लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सर्वाधिक होते. यंदाही केंद्रीय निवडणूक आयोगाने जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केला आहे. लोकांना मतदानासाठी उद्युक्त करण्यासाठी अनेक महनीय व्यक्ती ‘प्रतिनिधी’ म्हणून नियुक्त केलेल्या आहेत. त्यांनी मतदारांना अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या प्रयत्नांचा परिणाम मतदारांवर कसा झाला आहे, याची चुणूकही या प्रथम टप्प्यात दिसून येईल. एका वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणात 96 टक्के मतदारांनी यावेळी आपण निश्चित मतदान करणार, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्यापैकी 75 टक्के मतदारांनी जरी त्यांचा तो प्रत्यक्षात आणला, तरी आजवरचे मतदानाचे सर्व विक्रम मोडले जातील, याची निश्चिती आहे...
येत्या शुक्रवारी सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ होईल. लोकप्रतिधित्व कायद्याच्या अनुच्छेद 126 नुसार सर्व मतदारसंघांमध्ये मतदानविषयक कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या प्रथम टप्प्यासाठीच्या प्रचाराला खरेतर काहीशा विलंबाने प्रारंभ झाला, पण नंतर त्याला चांगलीच रंगत चढली. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यापासून प्रथम टप्प्याचा प्रकट प्रचार समाप्त होईपर्यंत, एकंदर 46 प्रचारसभा घेतल्या, तर 22 रोड शो केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही 23 प्रचारसभा आणि 10 रोड शो केले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता
बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आदी नेतेही प्रचारामध्ये व्यग्र राहिले. आता उत्सुकता मतदानाचीच आहे.
आठ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
- परिवहन मंत्री नितीन गडकरी : हे महाराष्ट्रातील नागपूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. त्यांना हॅटट्रिकची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांची कामगिरी उत्कृष्ट मानली जाते, त्यांच्यामध्ये नितीन गडकरी यांचा समावेश अग्रक्रमाने केला जातो.
- भूमीविज्ञान मंत्री किरण रिजीजू : केंद्रीय मंत्रिमंडळातील नावाजलेल्या मंत्र्यांमध्ये यांचा समावेश केला जातो. ते अरुणाचल प्रदेश पश्चिम मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच मतदारसंघातून ते 2004 पासून सातत्याने निवडून आलेले आहेत. त्यांना सलग पाचव्या विजयाची अपेक्षा आहे.
- जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल : हे आसामच्या दिब्रूगढ मतदारसंघातून दुसऱ्यांदा आपले भवितव्य आजमावीत आहेत. ते आसामचे माजी मुख्यमंत्रीही आहेत. वनवासी समाजातील एक लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचाही समावेश अत्यंत कार्यशील मंत्र्यांमध्ये नेहमी केला गेला आहे.
- जलस्रोत राज्यमंत्री संजीव बालियान : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर मतदारसंघातून हे उमेदवार आहेत. या मतदारसंघातून त्यांनी आजवर तीनदा निवडणूक जिंकली आहे. जाट समाजातील प्रभावी नेते म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यांची लोकप्रियता अन्य समाजांमध्येही असल्याने त्यांना विजयाची अपेक्षा आहे.
- राज्यमंत्री जीतेंद्र सिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात ते राज्यमंत्री आहेत. ते उत्तर प्रदेशच्या उधमपूर मतदारसंघातून 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. त्यांना यंदा हॅटट्रिकची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाचा भार त्यांनी उत्तम पेलला आहे.
- कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव : राजस्थानच्या अलवर मतदारसंघातून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या ते राज्यसभा सदस्य आहेत. या मतदारसंघात 2019 मध्ये निवडून आलेले बालक नाथ यांच्या स्थानी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागासवर्गीय समाजात ते लोकप्रिय आहेत.
- कायदा आणि न्याय (स्वतंत्र प्रभार) मंत्री अर्जुनराम मेघवाल : यांना राजस्थानच्या बिकानेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ते या मतदारसंघातून सलग तीनदा निवडून आले आहेत. त्यांना चौथ्या विजयाची अपेक्षा आहे. तरुण वयापासून भारतीय जनता पक्षात असलेले ते मागासवर्गीय नेते आहेत.
- मत्स्यपालन राज्यमंत्री एल. मुरुगन : तामिळनाडूच्या नीलगिरी मतदारसंघातून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते मूळचे तामिळनाडूचे असले तरी सध्या मध्यप्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत. ते प्रथमच या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांची उमेदवारी वैशिष्ट्यापूर्ण मानण्यात येत आहे.
काही महत्वाचे उमेदवार
? चिराग पासवान : दिवंगत माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान लोकजनशक्ती पक्षाकडून बिहारच्या जमुई मतदारसंघात भविष्य आजमावत आहेत. ते याच मतदारसंघातून गेल्यावेळी विजयी झाले आहेत. दलित समाजातील महत्वाचे नेते अशी त्यांची त्यांच्या पित्याप्रमाणे ओळख आहे.
? नकुल नाथ : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ आपल्या पित्याच्या पारंपरिक छिंदवाडा या मतदारसंघातून लढत आहेत. त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. कमलनाथ यांचा प्रभाव आपल्याला तारुन नेईल, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे येथील परिणामाची उत्सुकता आहे.
? कुप्पुस्वामी अण्णामलाई : तामिळनाडूच्या कोईंबतूर मतदारसंघातून हे उमेदवार आहेत. ते भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू शाखेचे अध्यक्ष आहेत. दोन वर्षे त्यांनी या राज्यात भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले आहेत. तामिळनाडूतील पक्षाचे आशास्थान म्हणून ते ओळखले जातात.
? तामिलीसाई सुंदरराजन : प्रथम यांची नियुक्ती तेलंगणाच्या राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. गेली 8 वर्षे त्या तामिळनाडूत भारतीय जनता पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. त्यांनी राज्यपालपदाचा त्याग केला असून चेन्नई दक्षिण मतदारसंघात प्रथमच पक्षाने त्यांच्या रुपाने उमेदवार दिला आहे.
? कनिमोझी करुणानिधी : तामिळनाडूच्या थुतूकुडी मतदारसंघातून त्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या उमेदवार आहेत. राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी या मतदारसंघातून यापूर्वी दोनदा विजय मिळविला आहे. त्यांना येथून आता हॅटट्रिकची अपेक्षा आहे.
? जितीन प्रसाद : उत्तर प्रदेशात पिलिभित मतदारसंघातून यावेळी वरुण गांधी यांच्या स्थानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे घराणे मूळचे काँग्रेसचे आहे. त्यांचे पिता जीतेंद्र प्रसाद काँग्रेसचे मोठे नेते होते. जितीन प्रसाद प्रथम उत्तर प्रदेशातील धौराहरा मतदासंघातून विजयी झाले होते. ते केंद्रीय मंत्रीही होते.
? निशीथ प्रामाणिक : पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे एक लोकप्रिय मागासवर्गीय नेते म्हणून यांचा परिचय आहे. ते राज्यातील कूचबिहार मतदारसंघात आपले भवितव्य आजमावीत आहेत. 2019 मध्येही त्यांनी याच मतदारसंघातून मोठा विजय मिळविला होता. भारतीय जनता पक्षाच्या तरुण आणि धडाडीच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.