For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाचव्या टप्प्यात निवडणुकीत रंगत...

06:06 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाचव्या टप्प्यात निवडणुकीत रंगत
Advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदारसंघांची संख्या बरीच कमी, अर्थात, केवळ 49 असली तरी रंगत मोठी आहे. हा टप्पा भारतीय जनता पक्षासाठी अधिकच महत्वाचा असून काँग्रेससाठी आव्हानात्मक असल्याचे 2014 आणि 2019 च्या निवडणुकांवरुन दिसून येते. मागच्या निवडणुकीत याच टप्प्यातील मतदारसंघांनी भारतीय जनता पक्षाचा बहुमताचा मार्ग निर्वेध केला होता, असे तज्ञांचे मत आहे. या टप्प्यातील स्पर्धा काही मतदारसंघांमध्ये एकांगी, तर काही मतदारसंघांमध्ये चुरशीची आहे. त्यामुळे या टप्प्याचा या दृष्टीने विस्तृत आढावा घेणे आगत्याचे ठरणार आहे...

Advertisement

कोणते मतदारसंघ भक्कम ‘गड’

? पाचव्या टप्प्यात साधारणत: एक चतुर्थांश, अर्थात, 49 पैकी 12 मतदारसंघ कोणत्या ना कोणत्या पक्षाचे गढ किंवा बालेकिल्ले मानले जाण्याची प्रथा आहे. याचे कारण असे की हे मतदारसंघ गेल्या सलग तीन निवडणुकांमध्ये एकाच पक्षाने जिंकले आहेत. ओडीशामध्ये आस्का आणि कंधमाल, महाराष्ट्रात धुळे, दिंडोरी आणि कल्याण, झारखंडमध्ये हजारीबाग, पश्चिम बंगालमध्ये हावडा, सेरमपूर आणि उरुबेरिया, उत्तर प्रदेशात लखनौ आणि रायबरेली आणि बिहारमध्ये मधुबनी हे मतदारसंघांमध्ये विशिष्ट पक्षांचा पराभव करणे हे जटील आव्हान मानले जाते. पुढील कोष्टकावरुन हा मुद्दा लक्षात येईल...

Advertisement

परिस्थितीत कसे पडले अंतर...

? 2013 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रथमच राष्ट्रीय राजकारणात आणले गेले आहे. त्यानंतर परिस्थितीत कसे अंतर पडत गेले हे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. 2009 मध्ये काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील 49 जागांपैकी केवळ 6 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 14 जागांवर यश मिळाले होते. मात्र, 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस मोठ्या प्रमाणावर कमजोर झालेली दिसून येत आहे. 2014 मध्ये याच 49 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाने 27 जिंकले होते. तर काँग्रेसला केवळ 2 मिळाले होते. 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 32 जिंकले होते, तर काँग्रेसला केवळ 1 होता.

? 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या 49 मतदारसंघांपैकी 40 मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले होते. ऊर्वरित जागा आपल्या मित्रपक्षांना सोडल्या होत्या. या 40 मतदारसंघांपैकी 30 मतदारसंघांमध्ये पक्षाला 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. काँग्रेसने 36 मतदारसंघात उमेदवार दिले होते. त्या पक्षाला या 36 पैकी 17 मतदारसंघांमध्ये 10 टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली होती. ऊर्वरित मतदारसंघांमध्ये 10 टक्के ते 35 टक्के इतकी मते मिळाली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी बव्हंशी 2019 प्रमाणेच होती असे दिसून येते.

कोण, कोठे किती बळकट...

? पाचव्या टप्प्यातील 49 मतदारसंघांपैकी किमान 25 मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती भक्कम असल्याचे दिसून येते. कारण गेल्या तीन लोकसभा निवडणुकांच्या पैकी किमान दोन वेळा या मतदारसंघांमध्ये या पक्षाला विजय मिळाला आहे. तर काँग्रेसची स्थिती केवळ दोन मतदारसंघांमध्ये चांगली आहे. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांपैकी किमान 2 वेळा या पक्षाने ते जिंकले आहेत.

? धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य (महाराष्ट्र), लखनौ, झांशी, मोहनलालगंज, हमीरपूर, जालौन, केसरीयागंज, फैझाबाद, बांदा, कौशांबी, बाराबंकी (उत्तर प्रदेश), मधुबनी, सीतामढी, मुझफ्फरपूर (बिहार), हजारीबाग, कोडरमा, छतरा (झारखंड), सुंदरगड (ओडीशा), लडाख (लडाख) हे मतदारसंघ भारतीय जनता पक्षासाठी बळकट मानले जात आहेत.

कोठे प्रचंड मतांनी विजय...

? पाचव्या टप्प्यात ज्या मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे, त्यांच्यापैकी केवळ चार मतदारसंघ असे होते, जेथे 2019 मध्ये विजयी उमेदवाराला 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मताधिक्क्य मिळाले होते. या मतदारसंघांमध्ये बिहारमधील मधुबनी, महाराष्ट्रातील उत्तर मुंबई, झारखंडमधील छतरा आणि हजारीबाग हे आहेत.

मतांमध्ये हे अंतर किती होते, ते पुढील कोष्टकावरुन स्पष्ट होईल...

मतदारसंघ          विजयी पक्ष                     अंतर

मधुबनी             भारतीय जनता पक्ष         4 लाख 55 हजार

हजारीबाग        भारतीय जनता पक्ष        4 लाख 79 हजार

छतरा              भारतीय जनता पक्ष        3 लाख 77 हजार

मुंबई उत्तर     भारतीय जनता पक्ष           4 लाख 65 हजार

कोठे निसटता विजय...

? पाचव्या टप्प्यातील 49 मतदारसंघांमध्ये चार मतदारसंघ असे आहेत की जिथे विजयाचे अंतर अगदी कमी म्हणजे, 2 टक्क्यांपेक्षाही कमी होते. या मतदारसंघांची नावे उत्तर प्रदेशातील कौशांबी, ओडीशातील बोलंगीर, पश्चिम बंगालमधील बराकपूर आणि आरामबाग अशी आहेत, अशी माहिती मिळते.

मतांच्या संख्येत हे अंतर किती कमी होते, ते पुढील कोष्टक दर्शविते...

मतदारसंघ       विजयी पक्ष                   अंतर

कौशांबी          भारतीय जनता पक्ष      39 हजार

आरामबाग       तृणमूल काँग्रेस            1  हजार 142

बराकपूर          भारतीय जनता पक्ष      14 हजार 857

बोलंगीर          भारतीय जनता पक्ष      19 हजार 516

कोठे उलटफेर...

? पाचव्या टप्प्यात 4 मतदारसंघ असे आहेत की ज्यांच्यात यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनेकदा उलटफेर झालेला दिसून येतो. याचाच अर्थ असा की, या मतदारसंघांमध्ये कोणत्याही पक्षाचे एकांगी वर्चस्व किंवा एकांगी दुर्बलत्वही दिसून येत नाही. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला, ओडीशातील बारगढ, महाराष्ट्रातील पालघर अणि बिहारमधील सीतामढी असे हे चार मतदारसंघ आहेत.

निष्कर्ष

? या माहितीवरुन असे स्पष्ट होते की, आतापर्यंत मतदान पार पडलेल्या चार टप्प्यांप्रमाणे याही टप्प्यात मोठी चुरस आहे. गेल्या काही निवडणुकांचा विचार करता भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य सर्वसाधारणपणे दिसून येते. तथापि, विरोधी पक्षांनाही या टप्प्याने 10 वर्षांपूर्वीच्या काळात संधी दिली आहे. साहजिकच, पूर्वीच्या काळातील कामगिरी यावेळी व्हावी असे काँग्रेसला वाटत असणार आणि गेल्या दोन लोकसभा निवडणुकांप्रमाणेच येथे आपली कामगिरी व्हावी, अशी भारतीय जनता पक्षाची इच्छा असणार, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.