महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवडणुकीच्या तोंडावर बंदुक बोलू लागली!

06:28 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्रात गुन्हेगारांनी राजकीय नेत्यांशी जवळीक वाढवणे आणि नेत्यांनी त्यांना पवित्र करणे सुरू केले आहे. खून, बलात्कार, जबरी चोरी, खंडणी, भूमाफिया, मोकातील गुन्हेगार ‘हीच योग्य वेळ’ समजून राजकीय पक्षात दाखल होत आहेत. निवडणुका जवळ आल्या आहेत आणि प्रत्येक पक्षाला दबावाच्या राजकारणासाठी गुन्हेगारच हवे आहेत! त्यातून बंदुकी बोलू लागल्या. आमदार जेलमध्ये तर नगरसेवक ढगात पोहोचू लागले.

Advertisement

मुंबई महापालिकेचे ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची झालेली हत्या खळबळ उडवून देणारी आहे. त्यांच्याच प्रभागात त्यांच्या विरोधात गतवेळी उभा राहिलेल्या आणि यावेळी मतभेद मिटले असे जाहीर करून फेसबुक लाईव्हला निमंत्रण दिलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने तासाभराचे फेसबुक लाईव्ह केल्यानंतर घोसाळकर यांना गोळ्या घातल्या आणि स्वत:ही आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्राला हादरा दिला आहे. इतक्या सहजपणे एखाद्या नगरसेवकाचा खून होत असेल तर सर्वसामान्य नागरिक इथे सुरक्षित आहेत का? हा प्रश्नच निर्माण होतो. त्यात या आठवड्यात ज्या घटना समोर आल्या, त्यानुसार तर गुंडांनी उच्छाद मांडल्याचे आणि निवडणुकीच्या तोंडावर आपल्यावरील कारवाया टाळण्यासाठी वेगवेगळ्या मंत्र्यांच्या दरवाजांवर माथा टेकल्याचे दिसून आले आहे. घोसाळकर यांची हत्या करून आत्महत्या केलेला व्यक्तीसुद्धा चारच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटून गेला होता, असे छायाचित्र प्रसारित करून विरोधी पक्षाने सरकारवर आरोप सुरु केले आहेत.

Advertisement

अर्थात एकट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच गुन्हेगारांनी रीघ लावली आहे, अशातला भाग नाही. सत्ता पक्षातील प्रत्येक नेत्याला गावोगावचे गुन्हेगार साकडे घालून आपल्यावर वरदहस्त असावा यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेकांची विविध खटल्यातून अचानकच जामीनावर मुक्तता सुरू झालेली आहे. अशा घटना एखाददुसऱ्या ठिकाणी नव्हे तर महाराष्ट्रात सर्वत्र घडताना दिसून येत आहेत. गुन्हेगार निवडणुकीच्या तोंडावर जामीनावर बाहेर पडतात किंवा त्यांच्यावरील विविध कारवाया, हद्दपारीच्या नोटीसा थांबतात किंवा जारी केल्या जातात. हेच मुळात निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून घडत असते. त्या त्या ठिकाणच्या पालकमंत्र्यांनी इशारा केल्याशिवाय पोलीस आणि महसूल यंत्रणा सतर्क होत नसते. त्यामुळे या मोसमातच अशा प्रकारची हालचाल होतेच होते. हे लक्षात घेतले तर तोंडावर असणाऱ्या लोकसभेच्या आणि पाठोपाठ विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यात हा खेळ सुरू झाला आहे, हेही लक्षात येते. याचा अतिरेक झाला आणि राजकीय संरक्षण मागायला आलेल्या किंवा आपण नेत्यांची गरज आहोत हे ओळखलेल्या हुशार गुन्हेगारांनी चक्क मंत्रालयात रील्स बनवले.  ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत अनेक गुन्हेगारांच्या बरोबरचे फोटो शेअर केले. काही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढ्यात उभा असलेल्या पिंपरीच्या गुन्हेगाराचे छायाचित्र प्रसिद्ध झाले.

सरकारची यामुळे मोठी बदनामी होऊ लागली. परिणामी पुण्यात तर गुंडांच्या टोळ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना मैदानावर बोलवून दम द्यावा लागला. मुख्यमंत्र्यांना खा. श्रीकांत शिंदे यांना वादग्रस्त लोक भेटवले म्हणून काही पदाधिकाऱ्यांची थेटपणे हकालपट्टी करावी लागली. पण ‘मागणी तसा पुरवठा’ करणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्यांचा यात जितका दोष आहे, त्याहून अधिक गुन्हेगारीला पाठीशी घालण्याची सर्वच पक्षात असलेली प्रवृत्ती त्याला कारणीभूत आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

कल्याणच्या सुभेदारीमुळे पेच

शिवसेना-भाजप युतीच्या काळात आनंद दिघे यांचा आग्रह आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका यामुळे ठाण्यातील अनेक ठिकाणी भाजपला शिवसेनेसाठी जागा सोडाव्या लागल्या. परिणामी प्रदीर्घकाळ ठाणे जिह्यात शिवसेनेचा दबदबा राहिला. अगदी युती तुटल्यानंतरसुद्धा कल्याण डोंबिवली सारखी महापालिका शिवसेनेने जिंकली. उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला सुरुंग लावल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत जोडून घेतल्यानंतर भाजपला या जिह्यात आपले वर्चस्व निर्माण करण्याची इच्छा जागृत झाली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण, संजय केळकर आमदार म्हणून यापूर्वी आग्रह धरत होते ते शांततेच्या मार्गाने. मात्र आमदार गायकवाडांनी तो ‘राम ठेका’ बिघडवला. आधीच मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मतदारसंघ असलेल्या कल्याणबाबत सातत्याने आग्रह धरला जात असून त्यातून तणाव वाढत चालला आहे. शिंदेसेनेकडून सुद्धा जिथे भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत तिथे प्रबळ विरोधकांना बळ देण्याचे राजकारण सुरू झाले आहे. त्या तणावातूनच उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात सुसंस्कृत कल्याण पूर्वच्या भाजपच्या आमदाराने शिंदे सेनेच्या पदाधिकारी असलेल्यास गोळीबार करून जखमी केले. या घटनेनंतर आठ दिवस महाराष्ट्र गुन्हेगारी उच्छाद पाहून बेजार झाला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सरकारमध्ये गोंधळ माजावा इतके गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केले. या प्रकारातून शिंदेसेना आणि प्रदेश भाजपमधील संबंध किती टोकाला पोहोचले आहेत त्याचे दर्शन घडले आहे. इतकेच नव्हे तर सरकारमधील सात मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यावर दबाव वाढवला.

इंडियाला धक्के तरीही...

देशात इंडिया आघाडीला धक्के बसले तरीही महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थिती चांगलीच दिसत आहे. तसे सर्व्हे सतत येत आहेत. शरद पवार यांच्या हातून पक्ष निसटला तरीही चित्र वेगळे दिसेना. आता काँग्रेस लवकरच फुटेल अशी चर्चा उठवणारे मान्यवर अभ्यासक गावोगाव फिरत आहेत. मात्र त्याचाही परिणाम होताना दिसत नाही. निवडणुकीत उमेदवारच विरोधकांकडे राहणार नाहीत असा सत्तापक्षाचा होरा आहे. पण, प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही.

परिणामी विरोधकांना रसद कमी पडेल अशी सध्या तरी स्थिती दिसत नाही. लोकसभेला मोदी यांना उत्तरेत चांगला प्रतिसाद मिळेल असे सांगितले जात असताना दक्षिण भारताप्रमाणेच महाराष्ट्रातही आव्हान दिसत आहे. त्यात सत्ताधाऱ्यांत असणारा बेबनाव अधिक कारणीभूत आहे हे तर निश्चितच आहे.

 

शिवराज काटकर

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article