शेवटी भारतीय संघाने माती खाल्लीच!
पहिल्या कसोटीत भारताने पर्थवर मिळवलेला ऐतिहासिक विजय त्यानंतर पिंक बॉल कसोटीमध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने विजयाची मोहोर उमटवली. ब्रिस्बेनच्या तिसऱ्या कसोटीमध्ये एखाद्या चेन स्मोकरप्रमाणे पावसाने व्यत्यय आणला. आणि तो सामना ड्रॉ राहिला. मेलबर्न येथील चौथ्या ऐतिहासिक कसोटीत भारतीय संघ पर्थची पुनरावृत्ती करेल, असा अंदाज होता. परंतु भारतीय संघाने शेवटी माती खाल्ली.
हा सामना सुरू होण्याअगोदरच भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण आत आणि कोण बाहेर असणार, यावरून थोडा कलगीतुरा रंगला होता. या सामन्यात जसप्रीत बुमराह वगळता कुणाकुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं हा मोठा यक्षप्रश्न माझ्यासमोर पडला होता. यशाचे धनी सर्वच असतात. परंतु अपयशाचे वाटेकरी कोण? याचं उत्तर भारतीय संघाने द्यायलाच हवं. नव्हे ते त्यांच्याकडून घ्यायलाच हवं. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कमालीची तफावत आढळली. विशेषत: कांगारूंच शेपूट हनुमानाच्या शेपटाप्रमाणे वळवळलं. या शेपटाने भारतीय संघाची खऱ्या अर्थाने राखरांगोळी केली. त्यातच भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक निद्रावस्थेत असल्याप्रमाणे तीन झेल सोडले. विशेषत: जैस्वालने लेगस्लिपला सोडलेला तो झेल त्याला त्याच्या निवृत्तीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत टोचत राहील. दुसऱ्या डावात जिथे 150 किंवा 160 मध्ये कांगारूचा संघ ड्रेसिंगरूममध्ये परतला पाहिजे होता तिथे त्यांच्या शेपटाने आपला डाव 225 पर्यंत खेचला. तिथेच भारतीय संघाचा अर्धा पराभव निश्चित झाला होता. शेवटच्या दिवशी क्रिकेटने या कसोटी सामन्यात आपले बरेच रंग दाखवले. चहापानापर्यंत हा सामना निश्चित अनिर्णीत राहणार असं वाटत असतानाच भारतीय संघ चहापानापासून ते खेळ संपेपर्यंत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कसोटी सामना म्हटला की उजव्या यष्टीबाहेर तुम्हाला टेस्ट केले जाणारच. या परीक्षेत तुम्ही किती वेळा नापास होणार? हे राहून राहून मला पडलेलं कोडं आहे. या सामन्यात जैस्वालला तिसऱ्या पंचाने ज्या पद्धतीने बाद दिलं ते निश्चितच प्रश्नांकित होतं. परंतु या वलयांकित प्रश्नांमुळे कांगारूचे यश हे झाकोळलं जाणार नाही हेही तेवढेच खरं.
या सामन्यात दोन्ही संघांच्या संघनायकाचा खरा कस लागला. त्यात उजवा ठरला तो पॅट कमिन्स. त्याने बोलँडसारख्या गोलंदाजांचा ज्या पद्धतीने वापर केला ते निश्चितच कौतुकास्पद होतं. या पराभवाने मेलबर्नवरील भारतीय चाहत्यांना निराश केलं. कोण म्हणते टेस्ट क्रिकेट रटाळ आहे? या कसोटी सामन्याला साडेतीन लाखाहून अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. अर्ध्याहून अधिक त्यातले भारतीय होते. परंतु त्याच भारतीयांची आपल्या घरी जाताना त्यांची झोळी रिकामीच राहिली. फरक एवढाच की हा सामना पाचव्या दिवसापर्यंत रंगला. कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवायचा असेल तर वीस गडी बाद करणे जसं अनिवार्य आहे, तसं ध्येयाचा पाठलाग करणे अनिवार्य असतं हे भारतीय संघ विसरून गेला. या पराभवामुळे कर्णधारपदावरून रोहित हटावची मोहीम जोर धरू लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात अकेला देवेंद्र क्या करेगा, त्याचे उत्तर आपल्याला मिळालं. क्रिकेटमध्ये अकेला बुमराह कहाँ कहाँ देखेगा, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. सरते शेवटी भारतीय संघाने ऐनवेळी माती खाली एवढं मात्र खरं.
-विजय बागायतकर