For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एलिमिनेटर’मध्ये आज दिल्लीचा सामना गुजरातशी

06:10 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘एलिमिनेटर’मध्ये आज दिल्लीचा सामना गुजरातशी
Advertisement

वृत्तसंस्था/ वडोदरा

Advertisement

पहिल्या तीन हंगामांत उपविजेता ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज मंगळवारी येथे महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात महत्त्वाकांक्षी गुजरात जायंट्स संघाचा सामना करताना सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रयत्न करेल.

लीगच्या संक्षिप्त इतिहासातील सर्वांत सातत्यपूर्ण संघांपैकी एक असलेल्या कॅपिटल्सने पुन्हा एकदा लीग टप्पा यशस्वीपणे पार करत अव्वल तीन संघांमध्ये स्थान मिळवले आहे, ज्यामुळे तो आतापर्यंतच्या चारही हंगामांत प्लेऑफसाठी पात्र ठरलेला एकमेव संघ बनला आहे. तथापि, त्यांचा 2026 चा हंगाम संमिश्र राहिला आहे, ज्यात वर्चस्व आणि सातत्यहीनता या दोन्ही गोष्टी दिसून आल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत, तर तितकेच गमावले आहेत. दिल्लीच्या गोलंदाजीची धुरा वेगवान गोलंदाज नंदिनी शर्माने सांभाळली आहे, जी विशेषत: अखेरच्या षटकांमध्ये प्रभावी ठरली आहे. तिने आपले 14 पैकी बहुतेक बळी अंतिम षटकांमध्ये घेऊन संघाला चुरशीच्या सामन्यांमध्ये टिकवून ठेवले आहे. तिला डावखुरी फिरकी गोलंदाज श्री चरणी (14 बळी) हिने चांगली साथ दिली आहे. शिवाय अनुभवी दक्षिण आफ्रिकी अष्टपैलू खेळाडू मारिझान कॅप (10 बळी) यामुळेही त्यांना नियंत्रण मिळविण्यास मोलाची मदत होत आहे.

Advertisement

फलंदाजीत कॅपच्या सहकारी लॉरा वोल्वार्ड (241 धावा) आणि लिझेल ली (240 धावा) यांनी डावाच्या सुऊवातीला संघाला स्थिरता दिली आहे. तथापि, भारतीय सलामीवीर शेफाली वर्माची (208 धावा) सातत्यहीनता ही चिंतेची बाब आहे. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सने संपूर्ण हंगामात सातत्यासाठी संघर्ष केल्यानंतर मागील सामन्यात दबावाच्या परिस्थितीत आपला फॉर्म परत मिळवल्याने कॅपिटल्सला दिलासा मिळेल. दुसरीकडे, गुजरात जायंट्सचा संघ तीन सामन्यांतील पराभवाच्या मालिकेतून प्रभावीपणे सावरल्यानंतर आत्मविश्वासाने एलिमिनेटर सामन्यात उतरत आहे. जायंट्सने सलग तीन विजय मिळवले, ज्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सविऊद्ध 11 धावांच्या आत्मविश्वास वाढवणाऱ्या विजयाचा समावेश आहे. दोन वेळच्या विजेत्यांविऊद्धचा हा त्यांचा पहिलाच विजय होता, ज्यामुळे त्यांनी बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले.

या हंगामातील दोन्ही लीग सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलेले असल्यामुळेही त्यांना आत्मविश्वास मिळेल. यात न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सोफी डिव्हाइनने दोन्ही प्रसंगी निर्णायक भूमिका बजावली. ही किवी स्टार या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे, तिने आठ सामन्यांतून 17 बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज म्हणून नाव कमावले आहे तसेच दोन अर्धशतकांसह 237 धावा केल्या आहेत. डेव्हिनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे ती जायंट्सची सर्वांत मोठी मॅचविनर ठरली आहे आणि पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने तिचा प्रभाव पुन्हा एकदा महत्त्वाचा ठरेल. जॉर्जिया वेअरहॅम फॉर्ममध्ये परतल्यामुळेही गुजरात संघाला बळ मिळाले आहे. ते मुंबईविऊद्धच्या तिच्या 26 चेंडूंतील नाबाद 44 धावांच्या आक्रमक खेळीतून दिसून आले आहे. जायंट्स संघ ऑस्ट्रेलियन दिग्गज बेथ मुनी आणि कर्णधार अॅश्ले गार्डनर यांच्याकडूनही महत्त्वाच्या योगदानाची अपेक्षा करेल. एलिमिनेटरचा विजेता संघ 5 फेब्रुवारी रोजी अंतिम फेरीत माजी विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी भिडेल.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.