जिल्ह्यात आजपासून ‘तेरसे’ शिमग्यांची ‘धुळवड’
रत्नागिरी :
शिमगोत्सवाची मोठी धामधूम खऱ्या अर्थाने ‘तेरसे’ शिमग्यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे. हे शिमगे मोठ्या दणक्यात गावोगावी साजरे होणार आहेत. तर धुलिवंदनाच्या दिवशी पौर्णिमेचे (भद्रेच्या मुर्हूतावर) शिमगे 14 मार्च रोजी साजरे करण्यात येणार आहेत. गावागावात शिमगोत्सवाचा आंनदोत्सव शिगेला पोहचला असून पालखी भेट सोहळे, संकासूर-गोमूच्या नृत्याबरोबर फिरत्या खेळ्यांनी उत्सवात रंग चढला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र शिमगोत्सवाचा माहोल दिसून येत आहे. गावकरी, चाकरमानी असे सारेच उत्सवाच्या नियोजनात व्यस्त झाले आहेत. गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या डौलाने ऊपे लावून सजल्या आहेत. जिह्यात 1399 पालख्या धुलिवंदनापर्यंत व त्यापुढेही अगदी गुढीपाडव्यापर्यंत तसेच काही मोठ्या गावांमध्ये त्यानंतरच्या काळातही भक्तांच्या भेटीला घरोघरी येणार आहेत. जिल्ह्यात 1315 ठिकाणी सार्वजनिक तर 2854 ठिकाणी खासगी होळ्या उभारण्यात येणार आहेत. तेरसे शिमगोत्सवास प्रारंभ झाल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरात स्थायिक असलेली मंडळी गावाकडे आली आहे. अनेकजण येण्याच्या मार्गावर आहेत. घरी येणाऱ्या पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थ व चाकरमान्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
- श्री देव भैरी देवस्थानतर्फे पालखी भेट सोहळा
रत्नागिरी शहरानजीकच्या गावोगावच्या अनेक पालख्या शहरातील बारा वाड्यांचे दैवत श्री देव भैरीबुवाच्या भेटीला मोठ्या डामडौलात ढोल-ताशांच्या गजरात येत असतात. त्यानंतर त्या आपापल्या गावी शिमगोत्सवासाठी परततात. सोमवारपासून जवळपासच्या गावातील अनेक पालख्या मारुतीमंदिर, जयस्तंभपासून श्री देव भैरी मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात येण्यास प्रारंभ झाला आहे. शहरात विविध पालख्या येणार असल्यामुळे श्री भैरी देवस्थानतर्फे त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.