काँग्रेसमध्ये ‘थोडी खुशी, थोडा गम’
आरोप-प्रत्यारोपांसह अनेकांनी दिले राजीनामे : पक्षात माजली खळबळ
पणजी : अमित पाटकर यांची गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर पक्षात खळबळ माजली असून पक्षातील अनेकांनी आरोप-प्रत्यारोप करुन राजीनामा सत्र आरंभल्याचे समोर आले आहे. हा निर्णय पक्षातील अनेकांना पसंत नसल्याचे दिसून आले असून त्याचा निषेध म्हणून हे राजीनामे देण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. हा बदलाचा निर्णय घेण्यापूर्वी कोणालाही विश्वासात घेण्यात आले नसल्याची अनेकांची तक्रार आहे. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस मनिषा उसगांवकर यांनी आक्रमक भाषेत याप्रकरणी निषेध करुन राजीनामा देत असल्याचे एका व्हिडिओतून जाहीर केले.
वर्ष 2022 मध्ये पक्षाचे काम झेपत नसल्याचे जाहीर करुन गिरीश चोडणकर यांनी राजीनामा दिला होता. तो मंजूर करण्यात आला आणि त्यांना अध्यक्षपदावरुन उतरवण्यात आले. मग आता त्यांना पुन्हा त्या पदावर कसे काय नेमण्यात आले? अशी विचारणा उसगांवकर यांनी केली असून त्याचे उत्तर काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी द्यावे, अशी मागणी केली आहे.
रणजितसिंग राणे, राजेश सावळ, दत्ताराम शेटये इत्यादी प्रदेश काँग्रेस पदाधिकारी तसेच गटाध्यक्ष यांनी अचानकपणे राजीनामे दिले असून त्यासाठी वैयक्तिक कारणे असल्याचे म्हटले आहे. आणखी काहीजण राजीनामे देण्याची शक्यता व चिन्हे दिसत असून नव्याने ताबा घेतलेले अध्यक्ष गिरीश चोडणकर यांची आता खरी कसोटी लागणार आहे. कमकुवत झालेल्या काँग्रेस पक्षाची पुन्हा उभारणी करणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा बदल पक्षासाठी तारक ठरणार की मारक हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर कळणार आहे.
जि. पं. निवडणुकीपूर्वीच झाला होता निर्णय : ठाकरे
पक्षातील ऊसवे फुगवे घालविण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करून समजूत काढणार आहे. त्यात नक्कीच यश येईल. घरगुती भांडणाचा शेवट गोड होईल, असा विश्वास पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. खरे तर डिसेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वीच गोव्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला होता. याविषयी बंगळुरू येथे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत स्थानिक नेत्यांची सविस्तर चर्चा झाली होती व त्यासंबंधी स्थानिक प्रमुख नेत्यांना पूर्ण कल्पनाही होती. त्यावेळी खर्गे यांनी जि.पं. निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल, असे संकेत दिले होते. त्यानुसार आता हायकमांडच्या माध्यमातून अधिकृत आदेश जारी झाला आहे. पुढील दोन दिवसात गोव्यात येऊन आपण पाटकर आणि खासदार फर्नांडिस व अन्य नेत्यांशी बैठक घेऊन चर्चा करणार आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.