तेलंगणात मुलीच्या प्रियकराची तिच्या कुटुंबीयांकडून हत्या
प्रेयसीसमोरच तिच्या आईने घेतला जीव
हैदराबाद : तेलंगणाच्या सांगारे•ाr येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवकाची त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबीयांनी जबर मारहाण करत हत्या केली आहे. तर प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे. मुलीच्या प्रियकराला घरी बोलावत तिच्या आईने विद्यार्थ्याला जबर मारहाण केली होती. या हिंसक हल्ल्यामुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. मैसमगुडा येथील सेंट पीटर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये ज्योती श्रवण साई हा शिकत होता. तो बीरामगुडाची रहिवासी असलेल्या 19 वर्षीय श्रीजावर प्रेम करत होता. त्यांच्या या प्रेमसंबंधांना श्रीजाच्या परिवाराकडून विरोध होता. तर श्रीजाच्या आईवडिलांनी श्रवणला दोघांच्या विवाहाविषयी बोलुया, असे सांगून घरी बोलाविले होते. तो घरी आल्यावर युवतीची आई आणि परिवाराच्या अन्य सदस्यांनी त्याच्यावर हल्ला केला. युवतीच्या आईने श्रवणला बॅटने जबर मारहाण केल्याने डोक्याला ईजा झाली होती. यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले आहे. अमीनपूर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.