प्रसंगी पोलीस अधिकारी, कर्मचारी बडतर्फीची कारवाई
गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांची विधानपरिषदेत माहिती : गैरकृत्यांबाबत शासनाचा ठाम निर्धार
बेळगाव : राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी गुन्हेगारी प्रकरणांत सहभागी आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कोणतीही तडजोड न करता कडक कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकरणांत संबंधितांविरोधात कायदेशीर गुन्हे दाखल करून, नियमांनुसार बडतर्फ करण्याची कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 88 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दिली.
आमदार टी. ए. शरवण यांनी प्रश्नोत्तर तासात राज्यात चोरी व दरोड्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असून यामध्ये पोलीस अधिकारीच सहभागी असल्याचे आढळून आले आहे. अशा अधिकाऱ्यांवर राज्य सरकार कारवाई का करत नाही. तसेच त्यांचे निलंबन न करता दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बरखास्त करण्याची कारवाई केली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.
याला उत्तर देताना गृहमंत्री परमेश्वर म्हणाले, राज्यात सध्या गुन्हेगारी प्रकरणांत सहभागी असल्याचे आढळून आलेल्या 88 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांत एफआयआर नोंदवून त्यांना अटकही करण्यात आली आहे. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
पोलीस दलाची प्रतिमा स्वच्छ, विश्वासार्ह व कायद्याच्या चौकटीत ठेवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील सर्व घटकांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर सतत लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. कर्तव्यपालनात कसूर, गैरवर्तन किंवा बेकायदेशीर कृती आढळल्यास त्याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, शिस्त व जबाबदारीची भावना वाढविण्यासाठी नियमित बैठका घेण्यात येत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन व सूचना दिल्या जात आहेत. पोलीस दलात नैतिक मूल्ये, कायद्याचे पालन, पारदर्शकता आणि जनतेशी विश्वासाचे नाते दृढ करण्यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. भ्रष्टाचार, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि गैरकृत्यांबाबत जागरुकता निर्माण करून अशा प्रकारांना आळा घालण्याचा शासनाचा ठाम निर्धार असल्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले.
पोलीस खात्यातील 3,600 रिक्त पदांसाठी लवकरच अधिसूचना : डॉ.जी.परमेश्वर
राज्य पोलीस खात्यातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागातील 3,600 रिक्त पदांच्या भरतीसाठी गृह विभागाच्या प्रस्तावाला अर्थ विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या भरतीसाठी लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. विधानपरिषदेत प्रŽाsत्तराच्या तासात सदस्य जगदेव गुत्तेदार यांनी विचारलेल्या प्रŽाला उत्तर देताना गृहमंत्री बोलत होते. अर्थ विभागाची मंजुरी मिळाल्यामुळे भरती प्रक्रियेला वेग आला असून, संबंधित अधिसूचना काढण्याची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अंतर्गत आरक्षणाची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करून अधिसूचना जारी करण्यात आली होती.
त्यामुळे या प्रक्रियेअंतर्गत 947 पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांची भरती पूर्ण झाली असून, निवड झालेले उमेदवार सध्या प्रशिक्षण घेत आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी 167 गृहरक्षक दलातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी दिली. विधानपरिषद सदस्य अग्निशमन दलाच्या वाहनांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वर म्हणाले, अग्निशमन विभागाकडे 15 वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण केलेली 358 वाहने आहेत. त्यापैकी 93 वाहनांची पुढील पाच वर्षांसाठी कालमर्यादा वाढवावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. याशिवाय नवीन 15 वाहने अग्निशमन विभागाकडे प्राप्त झाली असून, त्यांची केजीआयडी विमा आणि आरटीओ नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.