राजकारणात 'तेही राहतील' आणि 'मी ही राहीन', 'सगळेच राहतात'
मुख्यमंत्री फडणवीस यांची संयमी प्रतिक्रिया
मुंबई
महाराष्ट्राचे २१ वे म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी काल पार पडला. त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत लाडकी बहिण योजना, पुढील पाच वर्षांतील सरकारची धोरणं आणि राज्याचा विकास यावर त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत विरोधकांशी शत्रुत्त्व नसेल असेही सांगितले.
या परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याविषयी विचारणा झाल्यावर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिशय संयमी उत्तर दिले. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये जो राजकिय संवाद आहे, तो अजुनही संपलेला नाही. दाक्षिणात्य राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात हाच फरक आहे. अनेक राज्यामध्ये दोन राजकीय पक्षांच्या नेत्यात खू'न के प्यासे' अशा प्रकारे विसंवाद असतो. तशी महाराष्ट्रातील परिस्थिती कधीच नव्हती आणि यापुढे ही राहु नये यासाठी मी प्रयत्नशील राहीन. उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याविषयी विचारल्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजकारणात 'तेही राहतील' आणि 'मी ही राहीन', 'सगळेच राहतात.'
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी ३१ जुलै रोजी मुंबई येथील रंगशारदा सभागृहात एक मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी डाव आखत होते. मात्र मी सगळं काही सहन केले आणि उभा राहिलो. आता एक तर तु राहशील किंवा मी राहीन. भगवत् गीतमध्येही हेच आहे. अर्जुनाच्या पुढे त्याचे नातेवाईकच उभे होते. हे पाहुन त्यालाही यातना झाल्या होत्या. मग मला यातना होत नसतील का ?