छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून एक भीषण घटना घडली. बटोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथराई गावात एका ६० वर्षीय शेतकऱ्याला काठ्यांनी निर्घृणपणे मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर ट्रॅक्टरखाली चिरडून ठार करण्यात आले. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, ही घटना रविवारी घडली असून, दोन महिलांसह सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Old Farmer Murder आत्याच्या शेतात अडकला भाच्याचा जीव, चुलता आडवा येताच ट्रॅक्टरखाली चिरडून संपवलं...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वृद्ध व्यक्तीची ओळख सिल्मा गावातील रहिवासी होसाराम पैक्रा अशी पटली आहे. या हत्येतील मुख्य आरोपी त्यांचाच नातेवाईक असून तो पाथराई गावातील रहिवासी आहे.
६.३० एकर जमिनीसाठी संघर्ष
हा वाद सुमारे ६.३० एकर शेतजमिनीवरून सुरु होता. ही जमीन कामेश्वरी नावाच्या स्त्रीची होती होती तिला अपत्य नव्हते. ती होसारामच्या वडिलांच्या थोरल्या भावाची पत्नी आणि मुख्य आरोपी बजरंगची आत्या होती
न्यायालयाच्या निर्णयामुळे तणाव वाढला.
हे प्रकरण महसूल न्यायालयात पोहोचले तेव्हा सुरुवातीला होसारामच्या बाजूने निकाल दिला. पण, विरोधी पक्षाने (बजरंगच्या कुटुंबाने) या निर्णयाला एसडीएम न्यायालयात आव्हान दिले. एसडीएम न्यायालयाने पूर्वीचा निर्णय रद्द करून जमिनीची मालकी आरोपीला दिली. या नवीन न्यायालयाच्या आदेशामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव आणखी वाढला.
प्राथमिक माहितीनुसार, बजरंगचे कुटुंब रविवारी नांगरणी आणि पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन वादग्रस्त शेतात गेले होते. हे कळताच, होसाराम आणि त्याचे नातेवाईक ते काम थांबवण्यासाठी तिथे धावून गेले. दोन्ही बाजूंमध्ये लगेचच वाद सुरू झाला, ज्याचे रूपांतर लवकरच हिंसक संघर्षात झाले.
आरोपींनी सर्वप्रथम होसारामवर काठ्यांनी हल्ला केला. तो गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडल्यावर, त्यांनी त्याच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवला. ट्रॅक्टरच्या चाकांखाली चिरडून होसारामचा जागीच वेदनादायी मृत्यू झाला.
दोन महिलांसह ८ आरोपींना अटक
घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सीतापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीओपी) राजेंद्र मांडवी यांनी सांगितले की, दोन महिलांसह सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुटुंबीय आणि आरोपींचे जबाब नोंदवले जात असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ट्रॅक्टर चालवणारा मुख्य आरोपी उमेश याच्या व्यतिरिक्त, पोलिसांनी बजरंग, भुवनेश्वर, मनोज, रघुनंदन, बोधन आणि कमली व प्यारी या दोन महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टरही जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.