पाकिस्तानात अंडी 400 रुपये, कांदे 250 रुपये !
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानात सध्या महागाईने कळस गाठला असून अंड्यांचा दर 400 रुपये डझन असा झाला आहे. त्याचप्रमाणे कांदेही 250 रुपये किलो या भावाने मिळत आहेत. प्रशासन वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे, अशी जनतेची प्रतिक्रिया असून लोक संतप्त झाल्याचे दिसत आहे.
महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी पाकिस्तान सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव ठरवून दिले आहेत. त्यानुसार कांद्याचा दर 175 रुपये निर्धारित करण्यात आला आहे. तथापि, कोणीही या दराने कांदा विकत नाही. प्रत्येक व्यापारी निर्धारित दरापेक्षा 100 रुपये अधिक दराने विकत आहे. हाच प्रकार प्रत्येक वस्तूसंबंधी होत आहे. देशात नफाखोरी प्रचंड वाढली आहे.
विकास केवळ श्रीमंतांचाच
पाकिस्तानचा विकास दरही कमालीचा खालावला असून तो जास्तीत जास्त दोन टक्के आहे. जो विकास होत आहे, तो केवळ श्रीमंतांचाच होत आहे. गरीबांची परिस्थिती मात्र अधिकाधिक खालावत आहे, असे जागतिक बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या कर्जातही गेल्या 1 वर्षांत 12 लाख कोटी रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.