"माझ्या पतीला सोडा नाहीतर उडी मारुन आत्महत्या करेन" महिलेच्या पतीप्रेमाने पोलिसांचे धाबे दणाणले...
पतीच्या सुटकेसाठी थेट टॉवरवरुन चढून पोलिसांना धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीच्या सुटकेसाठी एका अल्पवयीन मुलीने आयुक्त कार्यालयाच्या आवारातील ५० फूट उंच टॉवरवर चढून, "माझ्या पतीला सोडा, नाहीतर मी उडी मारून आत्महत्या करेन," असे ओरडायला सुरुवात केली.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. पोलिसांना याची माहिती मिळताच, अतिरिक्त पोलीस आयुक्त विपिन ताडा, एक पोलीस उपआयुक्त (डीसीपी) आणि सहा पोलीस ठाण्यांतील पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस अधिकाऱ्यांनी त्या अल्पवयीन मुलीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. उपस्थित अधिकाऱ्यांनी तिला टॉवरवरून खाली उतरण्यास सांगितले . "आम्ही तुम्हाला न्यायाधीशांकडे घेऊन जाऊ,". "कृपया तुमची बाजू त्यांच्यासमोर मांडा असे तिला सांगण्यात आले. मात्र, जोपर्यंत माझ्या पतीची तुरुंगातून सुटका होत नाही, तोपर्यंत मी खाली उतरणार नाही, असा आग्रह त्या अल्पवयीन मुलीने धरला.
मुलीला समुपदेशनासाठी पाठवण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी त्या अल्पवयीन मुलीला टॉवरवरून खाली उतरण्याची विनंती करत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने नकार दिला. मंगळवारी दुपारी, तिच्या आरोपी पतीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
आपल्या पतीला पाहताच, ती अल्पवयीन मुलगी तात्काळ टॉवरवरून खाली उतरली, त्याला मिठी मारली आणि रडू लागली. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला समुपदेशनासाठी पोलीस लाइन्समध्ये पाठवले, तर आरोपी पतीला तुरुंगात पाठवण्यात आले.
अपहरण-पॉक्सो कायद्याचे कलम लावण्यात आले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त विपिन टाडा यांनी सांगितले की, २२ ऑक्टोबर २०२५ रोजी साचेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
साचेडी पोलिसांनी २६ ऑक्टोबर रोजी पीडितेला ताब्यात घेतले. बिठूर येथील एका तरुणालाही अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध अपहरणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर, पॉक्सो कायद्याची कलमे जोडण्यात आली.
आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपीने एका अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेले होते. त्यानंतर त्याने आर्य समाज मंदिरात तिच्याशी लग्न केले. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आरोपी तुरुंगात आहे. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात आरोपीला भेटल्यानंतर, पोलिसांच्या कारवाईवर नाराज झालेल्या त्या महिलेने पोलीस ठाण्यामागील वायरलेस कम्युनिकेशन टॉवरवर चढून उडी मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.