For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये माणसाचे अनेक जन्म मृत्यू होत असतात

06:46 AM Sep 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये माणसाचे अनेक जन्म मृत्यू होत असतात
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

चार युगांच्या जेव्हा हजार फेऱ्या होतात, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. रात्रही तेव्हढ्याच काळाची असते. ह्या कालावधीत जे मरत नाहीत ते खरे चिरंजीव होत. अर्थात चिरंजीव होणे हे देवांना सुद्धा दुर्लभ आहे. इतर देवांचे सोडून द्या, देवांचा राजाला म्हणजे इंद्रालासुद्धा हे अशक्य आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होतात ह्यावरून हे लक्षात येते पण जे इंद्राला अशक्य आहे ते भगवंतांची निरपेक्ष भक्ती करणाऱ्यांना मात्र साध्य होते. इतर योनी ह्या भोगयोनी म्हणून समजल्या जातात पण मनुष्ययोनी ही कर्मयोनी आहे. ह्यामध्ये निरपेक्ष कर्म करून चिरंजीव होणे शक्य आहे. मनुष्ययोनीमध्ये ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न न केल्यास पुन:पुन्हा जन्म-मरणाच्या चक्रातून फिरावे लागते. असे हजारो जन्म होऊ शकतात कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचा भव्य कालावधी त्याला कारणीभूत असतो.

ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे सर्व व्यक्त वस्तु ज्या अव्यक्तापासून उत्पन्न होतात त्याच अव्यक्तामध्ये त्या ब्रह्मदेवाची रात्र झाली की, नाहीशा होतात, असे भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत.

Advertisement

अव्यक्तापासुनी होती भूते व्यक्त दिनोदयी । रात्र होता लया जाती सगळी मग त्यात चि ।। 18 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ब्रह्म लोकात दिवस उगवल्यावर अमर्याद असे जग आकाराला येते. पुढे दिवसाचे चार प्रहर संपले की हा आकारसमुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकारसमुद्र भरावयास लागतो. शरद् ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशातून नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी ते पुन्हा उत्पन्न होतात त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय हजार चौकड्यांच्या काळ संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. रात्र झाल्यावर ही भूतसृष्टी अव्यक्तात लीन होते. हजार चौकड्यांची रात्र संपून उजाडू लागले की, पुन्हा भूतसृष्टी उत्पन्न होऊ लागते. ह्याप्रमाणे ब्रह्मलोकाच्या एका दिवसामध्ये जगाची उत्पत्ती व संहार होतात. हा कालावधी खूप मोठा असल्याने ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये माणसाचे अनेक जन्म मृत्यू होत असतात. हजारो, लाखो वर्षे हा क्रम चालू आहे.  ईश्वराशिवाय कुणीही कर्ता नसल्याने ह्या क्रमामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. असे भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत.

ती चि ती चि पुन्हा भूते त्यांचे काही न चालता । दिनांती मरती सारी उदयी जन्म पावती ।।19।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, हा त्रैलोक्याचा विस्तार ब्रह्मदेवाच्या गावाचा दिवस उजाडल्याबरोबर एकदम रचला जातो आणि रात्र झाली की आपोआप लीन होतो. ह्यामध्ये कुणाच्या कितीही मनात असले तरी त्यात बदल होऊ शकत नाही. ब्रह्मदेवाचा दिवस उगवला की, अव्यक्तातून अखिल विश्वाची निर्मिती होते आणि रात्री ते अव्यक्तात विलय पावते हे सांगितल्यानंतर भगवंत पुढील श्लोकात सांगतात, ह्या अव्यक्तापलीकडे एक अव्यक्त आहे ते मात्र कधीही नाश पावत नाही.

क्रमश:

Advertisement

.