केर्लेत प्रेमाच्या त्रिकोणातून मित्राचा खून
कोल्हापूर :
शाळेपासून सुरु असलेल्या प्रेमाच्या त्रिकोणातून मित्रानेच मित्राचा 70 ते 80 फुट खोल खणीमध्ये ढकलून निर्घुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी करवीर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीस अटक केली असून, त्याने खूनाची कबूली दिली आहे. शाळेतील मैत्रीणीवर आपले एकतर्फी प्रेम होते, मात्र त्या मैत्रिणीचे महेंद्र प्रशांत कुंभार (वय 18 रा. केर्ले ता. करवीर) याच्यावर प्रेम होते. यारागातूनच चिडून आपण महेंद्रचा खून केल्याची कबूली आरोपीने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, केर्ले (ता. करवीर) येथील हनुमाननगर येथील खणीमध्ये महेंद्र कुंभार नावाच्या तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळला होता. हा घातपात आहे की अपघात आहे या दृष्टीने करवीर पोलिसांनी तपास सुरु केला होता. महेंद्र कुंभार याला मंगळवारी सायंकाळी मित्राचा फोन आला म्हणून घरातून घाईगडबडीने गेला होता. यानंतरच तो बेपत्ता झाल्याची माहिती तपासात समोर आली होती. यानुसार पोलिसांनी महेंद्रच्या फोनचे डिटेल्स तपासले. यावरुन पोलिसांनी एका अल्पवयीन संशयीताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केला असता त्याने प्रथम या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी संशयीताच्या मोबाईलचेही डिटेल्स तपासल्यानंतर महेंद्रला शेवटचा फोन करणारा मित्र संशयीत असल्याचे समोर आले.
- अन् खूनाची कबूली दिली
पोलिसांनी चौकशी करत असताना आपण बरेची दिवस महेंद्रला भेटलो नाही. आपला फोनच उचलत नसल्याचा जबाब संशयीताने दिला. मात्र यानंतर संशयीताच्या फोनची कुंडलीच पोलिसांनी त्याच्या समोर ठेवली. तसेच घटना घडलेल्या खणीजवळ असणाऱ्या एका सिसीटीव्हीचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले. यामध्ये मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दोन मोपेड खणीकडे आल्याचे दिसून आले. यातील एक मोपेड महेंद्रची तर दुसरी संशयीत आरोपीची असल्याचे समोर आले. हे सर्व दाखविल्यानंतर संशयीताने खूनाची कबूली दिली.
- पाठीमागून लाथ मारुन ढकलले...
मृत महेंद्र संशयीत आरोपी आणि एक तरुण शाळेमध्ये एकत्र होते. यावेळेपासूच संशयीताचे त्या मुलीवर प्रेम होते. मात्र ती तरुणी महेंद्रवर प्रेम करत होती. याचाच राग आपल्या मनात होता. यातूनच आपण महेंद्रला संपवण्याचे नियोजन केले. मंगळवारी रात्री वाजता संशयीताने महेंद्रला केर्ले फाट्यावर बोलावून घेतले. तुझ्याशी बोलायचे आहे, असा बहाणा करुन त्याला मोहिते खणीजवळ नेले. या ठिकाणी महेंद्र सोबत वाद काढून त्याला पाठीमागून लाथ मारुन खणीत ढकलून दिल्याची कबूली दिली.
- मनात प्रचंड राग
संशयीताच्या मनात महेंद्र बद्दल प्रचंड राग होता. आपला बालपणीचा मित्र असूनही त्याला खणीत ढकलून देताना संशयीताला काहीही वाटले नाही. याचसोबत त्याने महेंद्रचा फोनही दगडाने फोडून चेंदामेंदा केला होता.
- करवीर पोलिसांनी केला दुसऱ्या क्लिष्ट खूनाचा उलगडा
करवीर पोलिसांनी अत्यंत क्लिष्ट आणी संशयास्पद असणाऱ्या दुसऱ्या खुनाचा शिताफीने उलगडा केला. क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे एकाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. याचाही तपास करुन आरोपींना जेरबंद केले होते. केर्ले येथील महेंद्र कुंभार याचाही अपघात भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र करवीर पोलिसांनी या प्रकरणाचाही तपास करुन उलगडा केला. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शंकर कळकुटे, विजय तळस्कर, सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, अमीत जाधव, विकास जाधव यांनी हा तपास केला.
- शाळेतील मैत्री
महेंद्र, संशयीत आरोपी आणि ती मुलगी हे केर्ले गावातीलच रहिवाशी आहेत. शाळेय जिवनापासून ते तीघेही एकाच शाळेत होते. याचसोबत तिघेही एकाच वेळी नुकतेच 12 वी पास झाले आहेत. शाळेमध्ये असल्यापासून संशयीत आरोपी त्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र महेंद्र व त्या मुलीमध्ये अधिक मैत्री होती.
- रियल वन नावाने मैत्रीणीचा नंबर सेव्ह
महेंद्रच्या खून प्रकरणातील आरोपीने त्या मैत्रिणीचा नंबर रियल वन नावाने सेव्ह केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी आणि ती तरुणी यांच्यामध्ये दररोज संभाषण होत होते, मात्र ते मैत्रिपूर्ण असल्याचे मॅसेजमधून दिसून आले आहे. ती तरुणी संशयीताला फारसे मॅसेज करत नव्हती.
- सिसीटीव्ही, कॉल डिटेल्स आणि मॅसेज...
संशयीताने आपला या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. आपण त्यावेळी मार्केट यार्ड येथे वडीलांकडे गेलो असल्याचे तपासावेळी सांगितले. मात्र पोलिसांनी महेंद्रच्या फोनच्या तपासलेल्या डिटेल्स, घटनास्थळावरील सिसीटीव्ही फुटेज, त्याचे टायमिंग आणि संशयीत मार्केट यार्ड येथे गेल्याची वेळ याची उलट तपासणी केली असता या खूनाचा उलगडा झाला.