काश्मीरमध्ये दरीत कोसळून जवानासह 2 पोर्टरचा मृत्यू
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीर खोऱ्यात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये भारतीय सैन्याने एका सैनिकासह दोन पोर्टर गमावले. कर्तव्य बजावताना ही दुर्घटना घडली असून या सहकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल जवानांनी शोक व्यक्त केला आहे. बारामुल्ला जिह्यातील शीरी भागात रात्रीच्या गस्तीवर असताना उंचीवरून घसरून पडल्याने एका जवानाला वीरमरण प्राप्त झाले. हुतात्मा झालेला जवान हरियाणातील अकबरपूर येथील रहिवासी असून सुभेदार हिरा लाल असे त्याचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत भारतीय लष्कराचे दोन पोर्टर गुरुवारी सकाळी बारामुल्ला जिह्यातील अप्पर गुलमर्ग येथे घसरून दरीत पडले होते. शोध मोहिमेदरम्यान त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या निधनाबाबतची अधिकृत माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
वीरमरण प्राप्त झालेले सुभेदार हिरा लाल हे शीरी कॅम्पमधील फतेहगड येथे तैनात होते. सेवेवर असताना ते चुकून टेकडीवरून घसरून पडल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांना ताबडतोब बारामुल्ला येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) नेण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हुतात्मा जवानाचा मृतदेह शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर औपचारिकता पूर्ण होईपर्यंत जीएमसी बारामुल्ला येथील शवागारात ठेवण्यात आला होता.
कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या दोन पोर्टरची ओळखही पटली आहे. लियाकत अहमद दिदार (27) आणि इशफाक अहमद खटाना (33) अशी त्यांची नावे असून दोघेही बारामुल्ला जिह्यातील रहिवासी आहेत. गुरुवारी हे पोर्टर अनिता पोस्टकडे जात असताना ते घसरून दरीप पडले होते. येथे हिवाळ्यात जोरदार बर्फवृष्टी होते. बर्फाच्छादित आणि निसरडा मार्ग ओलांडताना दोन्ही पोर्टरचा तोल गेला आणि ते दरीत कोसळले. खराब हवामान आणि कठीण भूभाग असूनही सैन्य आणि स्थानिक बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू केली. रात्रभर सुरू ठेवण्यात आलेल्या सततच्या प्रयत्नांनंतर दोन्ही पोर्टरचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.