पोलाद उत्पादन क्षमता 161 दशलक्ष टनाच्या घरात
स्टील उद्योग स्थिर वाढीसाठी सज्ज असल्याचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांचे मत
नवी दिल्ली :
भारताने पोलाद उत्पादन क्षमता 161 दशलक्ष टन ओलांडली आहे आणि उद्योग स्थिर वाढीसाठी सज्ज आहे, अशी माहिती पोलाद विभागाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांनी दिली. राष्ट्रीय पोलाद धोरणानुसार, 2030 पर्यंत 300 दशलक्ष टन पोलाद उत्पादन क्षमता उभारण्याचे भारताचे महत्त्वाकांक्षी ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
राष्ट्रीय राजधानीत इंडियन स्टील असोसिएशन (आयएसए) च्या चौथ्या स्टील परिषदेला संबोधित करताना सिन्हा म्हणाले, ‘आम्ही आधीच 161 दशलक्ष टन क्षमता ओलांडली आहे. यामध्ये ब्लास्ट फर्नेस-बेसिक ऑक्सिजन फर्नेसद्वारे 67 दशलक्ष टन, इलेक्ट्रिक आर्क फर्नेसद्वारे 36 दशलक्ष टन आणि इंडक्शन फर्नेसच्या आधारे 58 दशलक्ष टन क्षमतेचा समावेश आहे.
सिन्हा म्हणाले की, भारत ही जगातील चौथ्या क्रमांकाची ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे आणि पुढील 10 वर्षांत दरवर्षी आठ ते 10 टक्के दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय उत्पादन क्षेत्राचा वार्षिक विकास दर सात ते आठ टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही क्षेत्रात स्टीलची मागणी वाढत आहे.
सिन्हा म्हणाले की, पोलाद क्षेत्रातील पीएलआय योजना चांगली प्रगती करतेय. या अंतर्गत 29,500 कोटींपैकी 10,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. या क्षेत्राला कार्बन उत्सर्जन, जागतिक बाजारातील मागणीशी आव्हानांचा सामना करायचा आहे.