गुहागरात ७५ फुटी ध्वजस्तंभ मुहूर्ताच्या शोधात
गुहागर :
येथील पोलीस परेड मैदानावर उभारलेला ७५ फुटी ध्वजस्तंभगेली २ वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. दोन वर्षापूर्वी उभारलेल्या या ध्वजस्तंभाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त साधण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. मात्र हे मुहूर्त हुकल्याने अजूनही नव्या मुहूर्ताचा शोध सुरुच आहे.
गुहागर विधानसभा मतदार संघातील गुहागर शहराकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे. कोणी मतदान मिळाले नाही म्हणून, कोणी नगरपंचायत आपल्या हातातून निसटली म्हणून तर कोणी आम्हाला एकमाफी सत्ता दिली नाही म्हणून रुसून आहे. अशामध्ये शहराचे काय व्हायचे ते होवो, अशी भूमिका घेतली जात आहे.
परिणामी शहरातून जाणाऱ्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर शहरातील १८०० मिटर दरम्यानच्या रस्त्यात पडलेले खड्डे व इतर रस्त्यांची अवस्था नेत्यांच्या उदासिनतेचे दर्शन घडवते. यामध्ये गेली दोन वर्षे गुहागर समुद्रचौपाटी लगत असलेल्या पोलीस परेड मैदानावर महसूल इमारतीच्या शेजारी उभारलेला ७५ फूट उंचीचा ध्वजस्तंभ राष्ट्रध्वज फडकण्यासाठी अजून किती वर्षे प्रतीक्षा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ध्वजस्तंभाला प्रकाशित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या दिव्यांचे ब्रैकेट गंजू लागले आहेत. ध्वज फडकवणारी साखळीही गंज पकडत आहे. परिसराला गवताने वेढले आहे. रंगरंगोटीही खराब झाली आहे. यामुळे या ध्वजस्तंभावर ध्वज फडकणार आहे की नाही? असा सवाल तालुकावासीय करत आहेत.
- १५ ऑगस्ट रोजीचाही मुहूर्त हुकला
१५ ऑगस्ट रोजी या ध्वजस्तंभाचे उद्घाटन होईल असे वाटले होते. यासाठी चार दिवस अगोदर या ध्वजस्तंभाची डागडुजी व स्वच्छता करण्यात आली. प्रशासनाने त्यादृष्टीने तयारीही केली आहे. मात्र उद्घाटन झाले नाही. आता या ध्वजस्तंभाच्या उद्घाटनासाठी संविधान दिनाचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला जात आहे