गिरोली प्राथमिक शाळेची दुरावस्था; एकाच खोलीत पहिली ते चौथीचे वर्ग सुरू
दुरावस्था झालेल्या खोलीची मतदान केंद्र म्हणून नोंद असल्याने दुरुस्ती करण्यास अडचण
वारणानगर प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील गिरोली येथील जिल्हा परिषदेच्या एका वर्ग खोलीची दुरावस्था गेल्या तीन वर्षापासून झाल्याने एकाच खोलीत पहिली ते चौथी चे वर्ग सुरु असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शाळा चालवण्यास पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तातडीने दखल घेवून पावसाळ्यापुर्वी धोकादायक खोली पाडून नवीन बांधून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
दख्खनचा राजा जोतीबा डोंगराच्या पुर्वेला मध्यावरच असलेल्या गिरोली जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली आहे. या गांवात पहिली ते चौथी पर्यन्त शाळा आहे. यासाठी एकच ४० वर्षापुर्वीची जुनी कौलारु इमारत आहे. तर दुसरी अलिकडच्या काळातील सिमेंटमधील आहे. जुनी इमारतीचे रुपकाम मध्याभागी खराब होवून खाली आले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळून मुलांच्या जीवीतास धोका उदभवू शकतो म्हणून गेल्या तीन वर्षापासून शिक्षकांनी चारही वर्ग एकाच खोलीत भरवून ज्ञानदानाचे काम सुरु केले आहे. या एकाच खोलीत कार्यालय,पोषण आहाराचे साहित्य व त्यांचे वाटप करताना अडचणी निर्माण होत आहेत.
गिरोली येथील शाळा व्यवस्थापन समितीने व शिक्षकांनी धोकादायक इमारतीचे ऑडिट करुन निर्लेखनाची परवानगी मागितली आहे. मात्र ती अद्याप प्राप्त झालेली नाही. सदर इमारत खोली पन्हाळा तहसिलदार यांचेकडे मतदान केंद्र म्हणून नोंद असल्याने परवानगी नाकारली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. शाळा बांधण्यास खुली जागा असूनही शासनाच्या धोणाचा फटका ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना बसत असल्याने पालकांच्यात संताप व्यक्त होत आहे.
या गावातील विद्यार्थ्यांना पाचवी ते सातवी शिक्षणासाठी जोतीबावर ३ किलोमीटर चालत किंवा जाखले येथे ६ किलोमिटर सायकलने जावे लागते. दोन्हीकडे जाताना जंगल व त्यामध्ये सध्या वावर असलेले गवे आणि बिबट्या यांचा सामना करत शाळेचा येण्याजाण्याचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पाचवीपर्यंत याचठिकाणी शाळा व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
पावसाळ्यापुर्वी शाळा खोलीचे बांधकाम करुन द्यावे अशा आशयाचे निवेदन आमदार विनय कोरे यांना नुकतेच ग्रामस्थांनी भेटून दिले. त्यांनी तातडीने दखल घेवून जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार केला आहे. निवेदन देण्यासाठी सरपंच छाया गुरव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रुपाली पाटील, मोहन कदम, युवराज पाटील, चद्रकांत सुतार, विकास कांबळे, मुख्याध्यापक राजाराम पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीवर सर्व महिला सदस्य असलेली शाळा
जिल्हा परिषद शाळेची शाळा व्यवस्थापन समितीवर सर्व महिलांनाच ग्रामस्थांनी स्थान दिले आहे. त्यामुळे सर्व समितीचे सद्स्य महिलाचा असणारे हे कोल्हापूर जिल्ह्यतील एकमेव गांव असल्याची माहिती मुख्याध्यापक राजाराम पाटील यांनी दिली.