‘इन गलियों में’चा ट्रेलर प्रदर्शित
सत्यप्रेमकहाणी दाखविणार चित्रपट
‘इन गलियों मे’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात सद्यकाळातील प्रेमकहाणी दाखविण्यात आली आहे. दोन मनं सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळतात, परंतु स्वत:चे प्रेम प्राप्त करण्यासाठी त्यांना जगाशी लढावे लागते. दोन वेगवेगळ्या धर्मांमध्ये मैत्री तर सहन केली जाते, परंतु प्रेम नाही असे यात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात ‘उडा हवा में रंग है’ हे रंगपंचमी विशेष गीत असून ते लोकांची मने जिंकत आहे. अविनाश दास यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट सद्यकाळातील प्रेम, सामाजिक नाते आणि सोशल मीडियाच्या शक्तीवर आधारित आहे.
सोशल मीडियाद्वारे विवान शाहला अवंतिकावर प्रेम जडते आणि तिला प्रपोज करण्यासाठी त्याला खूप काही करावे लागते असे ट्रेलरमध्ये दर्शविण्यात आले आहे. परंतु दोघेही प्रेमात पडल्यावर समाजाचा त्रास त्यांच्यासमोर येतो, ज्याच्याशी लढण्यास ते स्वत:ला कमकुवत मानू लागतात. दोघांचे प्रेम त्यांच्या प्रथा-परंपरांच्या पुढे जात स्वत:चे लक्ष्य प्राप्त करणार की नाही हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.
अवंतिका आणि विवान शाह यात मुख्य भूमिकेत आहेत. तसेच जावेद जाफरी यात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. यदुनाथ फिल्म्सकडून निर्मित हा चित्रपट 14 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.