गगनबावड्यात शिवकृपा मंडळाचा 43 वर्षे अविरत परंपरेचा वारसा
गगनबावडा :
येथील शिवकृपा तरुण मंडळाच्या गणेशोत्सवात 1982 पासून आजअखेर सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे. मंडळाने समाज प्रबोधनासाठी असंख्य उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. सामाजिक शांतता व सलोखा राखण्यासाठी मंडळाने नाना प्रयत्न केले आहेत. या मंडळाच्या यशस्वी वाटचालीची दखल घेत शासकीय व सेवाभावी संस्थांनी केलेला गौरव कौतुकास्पद आहे.
गगनबावडा येथे शांतता व सुव्यवस्था असावी, जातीय सलोखा निर्माण व्हावा, यासाठी 43 वर्षांपूर्वी शिवकृपा तरुण मंडळाची स्थापना केली. तत्कालिन स्थानिक कार्यकर्ते कै. अनिल विभूते, कै. रामभाऊ बोभाटे, कै. वामनराव मसूरकर, कै. नंदकुमार सावंत तसेच अभय बोभाटे, यशवंत सावंत, मधूकर प्रभूलकर, विश्वनाथ पोतदार, सोमप्रकाश माळी आणि अन्यजणांच्या पुढाकाराने ग्रामदैवत ऊगवाई मंदिरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
चार वर्षांपासून या मंदिराचा जीर्णोद्धार सुरु आहे. येथील मुरलीधर वाचन मंदिर समोरील गिरीराज भवनमध्ये मंडळाने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने भक्तांची गर्दी असते. तत्कालिन परिस्थितीत कोकणातील 37 नांवे गगनबावड्यात समाविष्ट होती. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे येथील हा सोहळाही अविस्मरणीय होत असे. पोवाडे, भजन स्पर्धा, कीर्तन व एकांकिका स्पर्धेद्वारे समाज प्रबोधन केले जात होते. बदलत्या काळाचा विचार करत असंख्य उपक्रम राबवले जातात. झिम्मा फुगडी स्पर्धा, संगीत खुर्ची आणि अन्य स्पर्धांच्या निमित्ताने महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जात आहे.
रक्तदान, आरोग्य शिबीर घेतली जात आहेत. परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती राबविली जाते. तहसिलदार जी. जे. गोरे, गटविकास अधिकारी अल्मास सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले आहे.
गणेशोउत्सव म्हंटले की कानावर कर्कश आवाज पडणारी सूंड सिस्टीम, डोळ्यांची बुबुळे हलवणारा लेसर लाईटच्या झगमगाट समोर येतो. या सर्वांना फाटा देत हे मंडळ पारंपरिक ढोल-ताशांचा वापर करते. ध्वनीप्रदूषण, हवेचे प्रदुषण थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक वाद्यांचा वापर करून सर्वांना संधी दिली आहे. स्थानिकांच्या कलेला दाद देण्यासाठी रात्री जागरणीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला जात आहे.
शिवकृपा तरुण मंडळाचे अध्यक्ष विशाल सावंत, उपाध्यक्ष कैलास सूर्यवंशी, आकाश पोतदार, सुनिल सावंत, सुनिल माळी, संदेश ठोंबरे, दिपक कांबळे, प्रमोद सावंत, सतीश परिट, पार्थ शिंदे, जावेद अत्तार आदी पदाधिकाऱ्यांच्यावतीने विविध उपक्रम हाती घेत मंडळाची वैभवशाली परंपरा जतन करून ठेवली आहे.
- वैभवशाली परंपरा
गगनबावडा येथील सर्वात जुन्या शिवकृपा तरुण मंडळाने समाज प्रबोधनासाठी सर्व गटातील लोकांना सामावून घेतले आहे. विविध कलागुणांना संधी दिली जाते. या मंडळास वैभववाडी परंपरा लाभलेली आहे.
- ज्ञानदेव वाघ, सहायक पोलीस निरीक्षक, गगनबावडा