चीनमध्ये कुत्रा, डुक्कर, दगड असते मुलांचे नाव
मुलाचा जन्म होताच आईवडिल त्याच्यासाठी एक प्रेमळ नाव शोधू लागतात. कुणी देवाच्या नावावर मुलाचे नाव ठेवतो. तर कुणी एखादा खास अर्थ असलेले नाव निवडतो. परंतु जुन्या चीनमध्ये आईवडिल स्वत:च्या मुलांची नावे श्वान, डुक्कर अशी ठेवत होते. हा प्रकार विचित्र वाटत असला तरीही यामागे एक खास कारण होते. आईवडिल स्वत:च्या मुलांना वाईट नशीब आणि वाईट आत्म्यांपासून वाचण्याच्या आशेने हे करत होते.
प्राचीन चीनमध्ये अनेक परिवार मुलांना अशी नावे देत होते, जी ऐकण्यास साधारण परंतु विचित्र वाटायची. त्यावेळी वैद्यकीय चिकित्सा आतासारखी प्रगत नव्हती. मुले आजारी पडणे आणि कमी वयात मृत्यू होण्याची भीती असायची. अशास्थितीत आईवडिल स्वत:च्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या मान्यतांवर विश्वास ठेवायचे. जर मुलाचे नाव अत्यंत साधारण आणि कमी आकर्षक असेल तर वाईट आत्मे त्याच्याकडे लक्ष देणार नाहीत. यामुळे मूल वाईट नजर आणि दुर्दैवापासून वाचू शकतो असे त्यांना वाटायचे. परंतु ही लोकांची पारंपरिक मान्यता होती, याचा कुठलाच वैज्ञानिक पुरावा नाही.
अजब नाव
प्राचीन चीनमध्ये मुलांसाठी केवळ श्वान किंवा डुक्कर अशीच नावे निवडली जात नव्हती. काही परिवार त्यांना दगड, लोखंडी खांब आणि हातोडा यासारख्या गोष्टींच्या नावाने देखील पुकारायचे. यामागे आपले मूल या गोष्टींप्रमाणे मजबूत होईल आणि आजार तसेच अडचणींचा सामना करू शकेल अशी अपेक्षा आईवडिलांना असायची. इतिहासाशी निगडित काही लेखांमध्ये अशा नावांचा उल्लेख मिळतो, ज्याचा अर्थ आजच्या काळात अत्यंत विचित्र वाटू शकतो. उदाहरणार्थ काही मुलांना ‘गौ शेंग’ यासारखे नाव देण्यात येत होते, ज्याचा अर्थ श्वानाचे उरलेले अन्न असा सांगण्यात आला आहे. तर ‘झू वा’चा अर्थ डुकराचे पिल्लू असा होतो.
ही परंपरा केवळ सामान्य परिवारांपर्यंत मर्यादित नव्हती. प्राचीन चीनच्या काही प्रसिद्ध लोकांची आडनावे देखील अशी होती. पश्चिम हान राजघराण्याचा सम्राट वू याचे आडनाव ‘झी’ सांगण्यात आले. ज्याचा अर्थ डुक्कर असा होतो. तर प्रसिद्ध लेखक आणि राजनयिक सिमा शियांग्रू यांचे टोपणनाव ‘क्वान जि’ होते, ज्याचा संबंध श्वानांशी होता. या उदाहरणातून प्राचीन चीनमध्ये अशाप्रकारची नावे ठेवण्याची परंपरा दीर्घकाळापर्यंत प्रचलित राहिल्याचे कळते.
आजही काही ठिकाणी वापर
काळासोबत वैद्यकीय सुविधा सुधारल्या आणि लोकांच्या मानसिकतेतही बदल घडून आला. याचमुळे आता चीनमध्ये मुलांची अशी नावे ठेवण्याची परंपरा पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी झाली आहे. परंतु काही ग्रामीण भागांमध्ये आजही अशाप्रकारची नावे ऐकण्यास मिळतात. चीनच्या शान्शी प्रांतातील एका महिलेचा उल्लेख असून तिचे बालपणीचे नाव ‘गौ दान’ होते. जेव्हा तिची आई विद्यापीठात तिला भेटण्यासाठी पोहोचली आणि सर्वांसमोर तिला याच नावाने पुकारू लागली, तेव्हा तिचे सहकारी हसू लागले. यावर महिलेने बालपणी आपण गंभीर आजारी पडलो होतो, याचमुळे आईवडिलांनी हे नाव ठेवल्याचे स्पष्टीकरण दिले.
अशाप्रकारची नावे आज भले लोकांना विचित्र किंवा मजेशीर वाटत असली तरीही त्यावेळी आईवडिलांच्या स्वत:च्या मुलांना सुरक्षित अन् आरोग्यदारी पाहण्याच्या अपेक्षेशी संबंधित होती. म्हणजेच प्राचीन चीनमध्ये श्वान किंवा डुक्कर अशी नावे ठेवणे मुलाचा अपमान करणे नव्हे तर त्यांना वाईट शक्तींपासून वाचविण्याची एक पारपंरिक मान्यत होती. परंतु अशा मान्यतांना वैज्ञानिक आधार नाही.
