पोक्सो-बालविवाह प्रकरणात अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवावी
जिल्हा पंचायत सीईओंची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : सांत्वन केंद्रांना पोलिसांच्या मदतीची गरज भासल्यास जिल्हा पोलीसप्रमुखांच्या निदर्शनास आणून मदत घ्यावी, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली आहे. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात जिल्ह्यातील सांत्वन केंद्रांच्या विकास आढावा बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना राहुल शिंदे यांनी वरील सूचना केली आहे. पोक्सो व बालविवाह प्रकरणात बालविकास योजनाधिकारी तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाहीत. त्यांनी अशा प्रकरणात तक्रार दाखल करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
सांत्वन केंद्रामध्ये गंभीर समस्या असल्यास पोलीस खात्याची किंवा आपली मदत घ्यावी. त्यासाठी आपल्याशी थेट संपर्क करावेत. प्रत्येक सांत्वन केंद्रांना बालविकास योजना अधिकाऱ्यांनी स्वत: भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी करावी. समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करावीत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख श्रुती एन. एस., योजना संचालक रवी बंगारेप्पन्नवर, जिल्हा कायदा सेवा समितीचे सदस्य एस. एस. किवडसन्नवर, जिल्हा कामगार कल्याण अधिकारी संजीव भोसले, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे अधिकारी बसवराजू, महिला प्रतिनिधी सविता हेब्बार यांच्यासह बालविकास योजना अधिकारी व सांत्वन केंद्रातील अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.