क्षणात होत्याचे नव्हते, किनाऱ्यावर केवळ हुंदके
शिरोडा-वेळागर दुर्घटनेतील आणखी दोघांचे मृतदेह हाती : पाचजणांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
प्रतिनिधी/ वेंगुर्ले
थोडीशी बेपर्वाई आणि आनंद लुटण्याच्या नादात विवाह सोहळ्याच्या जय्यत तयारीत असलेल्या बेळगाव-लोंढा येथील कित्तूर व पिंगुळी-गुढीपूर येथील मणियार कुटुंबातील सर्व सुख-चैनच शुक्रवारी नियतीने हिरावून नेले. या कुटुंबियांवर अचानक कोसळलेल्या अस्मानी संकटाने शिरोडा वेळागरची किनारपट्टीही काळवटून निघाली होती. प्रचंड हळहळ आणि ह्य्दय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत सात निष्पाप जीवांचा हकनाक बळी गेला. दरम्यान, शिरोडा-वेळागर समुद्राच्या पाण्यात बेपत्ता असलेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह शनिवारी दुपारपर्यंत हाती लागले. सायंकाळपर्यंत अन्य दोघांची शोधमोहीम सुरू होती. कुडाळ, बेळगाव, सावंतवाडी आणि स्थानिक परिसरातील अनेकांची गर्दी बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसून आली.तहसीलदार ओंकार ओतारी व पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस पाटील, होमगार्ड, सुरक्षा रक्षक कवच सदस्य, रेस्क्यू टीमचे सदस्य व स्थानिकांचा गट तयार करून ठिकठिकाणच्या किनाऱ्यांवर तैनात केला होता. देवबाग येथील स्नॉर्कलिंकची प्रशिक्षित रेस्क्यू टीमही वेळागर किनारपट्टीवर ठाण मांडून होती. सकाळी ड्रोनद्वारे समुद्रातील पाण्यात काही संशयास्पद तरंगताना दिसतेय का, याचा शोध घेण्यात आला. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घटनास्थळी भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

शुक्रवारी मध्यरात्री, शनिवारी सकाळी सापडले दोन मृतदेह
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री बेपत्ता असलेला कुडाळ-पिंगुळीचा फरहान मणियार याचा मृतदेह घटनास्थळावरून दोन किलोमीटरच्या परिघात असलेल्या सागरतीर्थ किनाऱ्याला आढळला. स्थानिकांच्या सहकार्याने वेंगुर्ले पोलिसांच्या टीमने रात्रीच तो मृतदेह शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवला. त्यानंतर पहाटेपासून पुन्हा शोधमोहिमेला सुरुवात झाली. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मोचेमाड किनारपट्टीवरील आराकिला या पंचतारांकित हॉटेलच्या परिसरातील समुद्रात एक मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसून आला होता. मात्र, काही वेळातच हा मृतदेह पुन्हा दिसेनासा झाला. तासाभराच्या अंतराने पुन्हा हा मृतदेह त्याच ठिकाणी तरंगताना आढळला. स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने वेंगुर्ले पोलिसांच्या टीमने हा मृतदेह पाण्याबाहेर काढून रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. लोंढा-बेळगाव येथील इक्वान इमरान कित्तुर या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा हा मृतदेह असल्याची ओळख त्यांच्या नातेवाईकांनी पटविली.
रेडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन
मणियार कुटुंबियांना ओळखणारे कुडाळ, सावंतवाडी, बेळगाव येथील अनेकजण शिरोडा उपजिल्हा रुग्णालय, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र, वेळागर, सागरतीर्थ, मोचेमाड किनारा येथे ठाण मांडून होते. शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागरात ठेवण्यात आलेला एक-एक मृतदेह रुग्णवाहिकेतून रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या प्रत्येक क्षणाला त्यांच्या कुटुंबियांकडून होणारा आक्रोश तेथे उपस्थित असणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवित होता. अत्यंत दुर्दैवी अशा या घटनेने संपूर्ण परिसरावर दु:खाची छाया पसरली.
मणियार, कित्तुर कुटुंबियांचे घनिष्ठ नातेसंबंध
नियतीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-गुढीपूर येथील मणियार कुटुंबियांवर कोसळलेला हा दु:खाचा डेंगर अनेकांना अस्वस्थ करणारा ठरला. कुडाळचे मणियार आणि बेळगाव-लोंढाचे कित्तुर कुटुंबीय यांच्यात अतिशय घनिष्ठ नातेसंबध आहेत. लोंढा येथील कित्तुर कुटुंबियांची मुलगी कुडाळच्या मणियार कुटुंबात विवाह करून दिली आहे. मणियार कुटुंबातील फरहान या कित्तुर कुटुंबियांच्या भाच्याच्या लग्नाची तयारी करण्याच्या उद्देशाने ही दोन्ही कुटुंब एकत्र आली होती. चारच दिवसांपूर्वी मुंबई येथे लग्नाची खरेदी करून दोन्ही कुटुंबातील ही सर्व मंडळी पिंगुळी येथे दाखल झाली होती.
एकत्र जेवण केले
वेळागर येथे जाण्यापूर्वी गुरुवारी या सर्वांनी मिळून वेंगुर्ले शहरातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटला. शुक्रवारी सकाळी मालवण येथे जाऊन दुपारच्या भोजनासाठी त्यांनी शिरोडा वेळागर किनाऱ्यावर येणे पसंत केले. वेळागरला आल्यावर त्यांनी येथील सर्व्हे नं. 39 मधील सुरुच्या बागेत एकत्र बसून सोबत आणलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर बुजुर्ग मंडळींनी झाडाच्या सावलीत बसून विश्रांती घेतली तर युवा मंडळींनी सोबत आणलेल्या बॅट, बॉल व अन्य साधनांद्वारे खेळाचा आनंद लुटला.
ती पंधरा मिनिटे आणि अचानक आलेली लाट
सायंकाळी 4.30 वाजण्याच्या दरम्यान काहीजणांना समुद्राच्या पाण्यात उतरण्याची इच्छा झाली. मात्र, वेळागरमधील स्थानिकांनी त्यांना तेथे आल्याआल्याच समुद्रातील उधाणाची कल्पना दिली होती. पाण्यात जाणे धोकादायक होते. पण मानवी साखळी करून निदान किनाऱ्यावर कमी खोल पाण्यात भिजण्याचा तरी आनंद घेऊया, या उद्देशाने दहाजणांचा एक ग्रुप किनाऱ्यावर चप्पल, गॉगल आदी साहित्य ठेवून पाण्यात उतरला. केवळ 15 मिनिटे झाली असतील. पाण्याला वेगळीच ओढ होती. पायाखालची वाळूही सरकत होती. सर्वजण एकमेकांचा हात घट्ट धरून मानवी साखळी करून पाण्यात उभे होते. 4.45 वाजण्याच्या सुमारास एक मोठी लाट किनाऱ्यावर अचानक येऊन थडकली. या लाटेने होत्याचे नव्हते केले. त्यांची मानवी साखळी तुटली. सर्वजण विखुरले गेले. दहापैकी एकटा आधीच पाण्याच्या वर आला होता. उर्वरित नऊजण स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आटापिटा करू लागले. एकच आरडाओरड सुरू झाली. किनाऱ्यावरील अनेकांनी तेथे धाव घेतली. पण कुणाचेच शहाणपण चालले नाही. बघता-बघता अनेकजण पाण्यात दिसेनासे झाले.
स्थानिक तरुणांच्या धावपळीमुळे वाचले दोघांचे प्राण
किनाऱ्यावर आरडाओरड सुरू होताच तेथून जात असलेले वेळागर संघर्ष समितीचे आजू आमरे यांनी पाण्यात जाऊ पाहणाऱ्यांना तात्काळ वर घेतले. दोरखंड, ट्यूब आदी साहित्य गोळा करून किनाऱ्यावर आक्रोश करणाऱ्या इमरान कित्तुर यांना वर घेतले. तेथून जवळच इसरा ही इमरान यांची 17 वर्षीय मुलगी त्यांना बुडताना दिसली. आबा चिपकर, समीर भगत, सूरज आमरे, नेल्सन सोझ आणि राज वॉटर स्पोर्टस्च्या कर्मचाऱ्यांनी एकच धावपळ करून बुडणाऱ्या या युवतीला पाण्याबाहेर काढले. ती बेशुद्धावस्थेत असल्याने तिला तात्काळ आनंद नाईक या पायलटच्या मोटारसायकलवरून उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे वेळीच उपचार झाल्याने तिचे प्राण वाचले. याच दरम्यान आणखी तिघेजण पाण्यात दिसून आले. या पाचही धाडसी युवकांनी जीवाची बाजी लावून पाण्यात पोहत जाऊन त्यांना पकडले व किनाऱ्यावर आणले. त्यांच्या पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना श्वास देण्याचाही प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता. शुक्रवारी गतप्राण झालेल्या या तिघांमध्ये फर्रान व इबाद या माय-लेकराचा सामावेश होता.
दुर्घटनेत बळी ठरलेले जवळचे नातेवाईक
दुर्घटनेत सापडलेले सर्वजण घरगुती नातेसंबंधातील सदस्य होते. ज्याचा विवाह होता, त्या मृत फरहान मणियारचा सख्खा मामा इरफान कित्तुर, मामी फर्रान कित्तुर, त्यांचा मुलगा इबाद कित्तुर, दुसऱ्या मामाचा मुलगा इकवान कित्तुर व त्यांचा चुलत भाऊ जाकीर मणियार असे जवळचे नातेवाईक दुर्घटनेचे बळी ठरले. तर बळी ठरलेली नमिरा अक्तार हीदेखील मृत इमरानची जवळची नातेवाईक होती. बेळगाव-लोंढा येथील इरफान मोहम्मद इसाक कित्तुर (36) व गुढीपुर पिंगुळी येथील जाकीर निसार मनियार (13) या दोघांचे मृतदेह अद्याप सापडले नाहीत.