ओझरे खुर्द येथे घरफोडीत ६५ हजारांचा ऐवज लंपास
देवरुख :
नजीकच्या ओझरे खुर्द येथे घरफोडी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. चोरट्याने चांदीच्या वस्तु, गॅस सिलेंडर असा एकूण ६५ हजार ४५० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात सोमवारी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चंद्रशेखर प्रभाकर सरदेशपांडे यांनी फिर्याद दिली आहे. सरदेशपांडे हे १० मे ते ८ जून या कालावधीत कामानिमित्त बाहेर गेले होते. यादरम्यान चोरट्याने डल्ला मारला. यात चांदीचे ताट (७ हजार ५०० रुपये), चांदीचे तामण (६ हजार २५० रुपये), चांदीचा तांब्या (५ हजार), चांदीचे पेले (५ हजार), चांदीच्या वाट्या (२ हजार ५००), चांदीची पळी (१ हजार २५०), चांदीच्या दोन अत्तरदानी (५ हजार), चांदीचे चार निरंजन (५ हजार), चांदीचा बोडल (१ हजार २५०), चांदीचा कमरपट्टा (७ हजार ५००), चांदीचा मेखला (५ हजार), चांदीचा कॉइन (२५० रुपये), ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुकडे (१२ हजार रुपये), इण्डेन कंपनीचा भरलेला गॅस सिलेंडर (८०० रुपये), एचपी कंपनीचा रिकामी गॅस सीलिंडर (४०० रुपये), नारळ (७५० रुपये) असा एकूण ६५ हजार ४५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सरदेशपांडे सोमवारी घरी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सरदेशपांडे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फीर्याद दिली. यानुसार पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सबनम मुजावर यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहय्यक पोलीस निरीक्षक सबनम मुजावर करीत आहेत.