इम्रान खान यांच्या बहिणीला अटक
माजी पंतप्रधानांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्यापूर्वी कारवाई
वृत्तसंस्था / लाहोर
कारागृहात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण अलीमा खानम यांना लाहोरमधील त्यांच्या घरातून पोलिसांनी अटक केली. इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी त्या 27 सप्टेंबर रोजी त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलन सुरू करण्याची योजना आखत होत्या. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेट कर्णधार इम्रान खान ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. पीटीआय पक्षाच्या प्रवक्त्याने अलीमा खानम यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे.
अलीमा खानम यांच्या अटकेपूर्वी इस्लामाबाद पोलिसांनी पीटीआयच्या चार कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले होते. 27 सप्टेंबरच्या आंदोलनाच्या तयारीशी संबंधित एका बैठकीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्यावर दंगल, सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप लावला आहे. ‘पीटीआय’ने 27 सप्टेंबर रोजी राजधानी इस्लामाबादमध्ये आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश इम्रान खानच्या सुटकेची मागणी करणे हा आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलीस आणि प्रशासनाने शहरातील मुख्य रस्ते आणि संवेदनशील भागांमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. आंदोलनाशी संबंधित हालचालींवरही लक्ष ठेवले जात आहे.