इम्रान खान यांची पुन्हा तुरुंगात रवानगी
गुरुवारी रात्री रशिया रुग्णालयात केले होते दाखल : समर्थक संतप्त
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीनंतर शुक्रवारी इस्लामाबादच्या शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमधून पुन्हा अडियाला तुरुंगात पाठविण्यात आले. रुग्णालयात 6 डॉक्टरांच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. इम्रान यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे इम्रान यांना कठोर सुरक्षेदरम्यान परत रावळपिंडी येथील अडियाला तुरुंगात हलविण्यात आले. इम्रान यांना गुरुवारी रात्री उशिरा तुरुंगातून रुग्णालयात आणले गेले होते. यादरम्यान सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाइल ताब्यात घेण्यात आले आणि रुग्णालयाच्या बाहेरील प्रसारमाध्यम प्रतिनिधींना हटविण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यावर इम्रान यांना पुन्हा तुरुंगात पाठविण्यात आले.
सरकारची पुनर्विचार याचिका
पाकिस्तान सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. इम्रान यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्याचा आदेश बदलण्यात यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यापूर्वीही सरकारने याच मागणीवरून पुनर्विचार याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाच्या रजिस्ट्रार ऑफिसने आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता न केल्याने याचिका नोंदवून घेण्यास नकार दिला होता.
इम्रान यांच्या वकिलाचा दावा
सर्वोच्च न्यायालयाकडून निश्चित कालमर्यादा संपुष्टात आल्यावर इम्रान खान यांचे वकील खालिद यूसुफ चौधरी यांनी आपण अडियाळा तुरुंगाबाहेर असूनही इम्रान यांना भेटू दिले गेले नाही असा दावा केला होता. इम्रान यांची काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घ्यायची होती, परंतु तुरुंग प्रशासनाने भेटण्याची अनुमती दिली नाही असा आरोप चौधरी यांनी केला आहे.
इम्रान यांच्या आरोग्यावरून चिंता
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालात इम्रान यांच्या आरोग्यावरून चिंता व्यक्त करण्यात आली होती. अहवालानुसार इम्रान यांना रक्तदाब, हृदयाचे ठोके तीव्र होणे आणि मानसिक तणावाची समस्या आहे. न्यायालयाने इम्रान यांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी वैद्यकीय बोर्ड स्थापन करण्याचा आदेश दिला आहे.