इम्रान खान अन् भुट्टो एकत्र येणार
पाकिस्तानात राजकीय उलथापालथ घडणार
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात पुढील काही दिवसांमध्ये दोन कट्टर विरोधक हातमिळवणी करताना दिसून येण्याची शक्यता आहे. माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)सोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे. नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीगला (पीएमएल-एन) रोखण्यासाठी पीपीपीने इम्रान खान यांच्यासोबत आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे. नवाज शरीफ हे अलिकडेच लंडनमधून परतले असून आगामी निवडणुकीत तेच पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
पीपीपी इतर पक्षांसोबत आघाडीसंबंधी निर्णय घेणार असून यात पीटीआय देखील सामील असल्याची माहिती पक्षाचे अंतरिम अध्यक्ष राणा फारुख यांनी दिली आहे. पीपीपी आणि पीएमएल-एनने एप्रिल 2022 मध्ये इम्रान खान यांचे सरकार कोसळल्यावर एकत्र येत सरकार स्थापन केले होते. नवाज यांचा पक्ष मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान आणि ग्रँड डेमोक्रेटिक अलायन्ससोबत मिळून सिंधमध्ये निवडणूक लढवू पाहत आहे. तर पीपीपी अन्य पक्षांसोबत आघाडी करत विरोधकांचा सामना करणार असल्याचे एका नेत्याने म्हटले आहे.
एखाद्या पक्षाला 2024 च्या निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास जग याचा निकाल स्वीकारणार नसल्याचे म्हणत राणा फारुख यांनी पीपीपीच्या भूमिकेचे संकेत देल आहेत. पीटीआयला निवडणुकीच्या शर्यतीपासून बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नाकरता पीएमएल-एनला पीपीपीचे नेते दोषी ठरवत आहेत. पीपीपीने देशाच्य आर्थिक संकटासाठी माजी अर्थमंत्री इशाक डार यांना जबाबदार ठरविले आहे.