For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तोशाखाना प्रकरणात इम्रान खान निर्दोष

06:02 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
तोशाखाना प्रकरणात इम्रान खान निर्दोष
Advertisement

माजी परराष्ट्र मंत्र्यांसह 8 जणांचीही सुटका

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणात इम्रान खान, माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यासह 8 जणांची निर्दोष मुक्तता केली. या दिलासादायी निकालाच्या एक दिवस आधी इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतरही इम्रान खान तुऊंगातच राहणार आहेत.  पाकिस्तानमध्ये यावषी फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीच्या काही दिवस आधी इम्रान यांना तीन प्रकरणांमध्ये एकूण 31 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Advertisement

इम्रान खानला 5 ऑगस्ट 2023 रोजी तोशाखाना प्रकरणात 3 वर्षांच्या तुऊंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. हा निकाल देताना इस्लामाबादच्या सत्र न्यायालयाने खान यांच्यावर 5 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. तसेच एक लाख ऊपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. सत्र न्यायालयाकडून शिक्षा घोषित होताच इम्रानना लाहोरमधून अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर ठिकठिकाणी ‘पीटीआय’च्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शाहबाज सरकारच्या विरोधात घोषणा सुरू केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

सरकारी भेटवस्तू विकल्याचा आरोप

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 2018 ते 2022 दरम्यान पंतप्रधानपदाचा गैरवापर केल्याचा आणि विदेश दौऱ्यादरम्यान मिळालेल्या सरकारी भेटवस्तू विकल्याचा आरोप आहे. ज्याची एकूण किंमत 6.35 लाख अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून इम्रान खान यांच्याविरोधात तोशाखाना खटला दाखल करण्यात आला होता.  पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने यापूर्वी खान यांना खोटी विधाने आणि खोटी माहिती दिल्याच्या आरोपाखाली सार्वजनिक पदासाठी अपात्र ठरवले होते.

काय आहे तोशाखाना प्रकरण?

पाकिस्तानच्या कायद्यानुसार, परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी म्हणजेच तोशाखान्यात ठेवावी लागते. जर राज्याच्या प्रमुखाला भेटवस्तू ठेवायची असेल तर त्याला त्याच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल. हे लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात ठेवल्या जातात किंवा त्याचा लिलाव केला जाऊ शकतो आणि त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा होतो. इम्रान खान यांच्यावर राज्य डिपॉझिटरी, तोशाखाना येथून सवलतीच्या दरात मिळालेल्या महागड्या ग्राफ रिस्टवॉचसह भेटवस्तू खरेदी केल्याचा आणि पंतप्रधान असताना नफ्यात विकल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांना त्यांच्या अधिकृत दौऱ्यांमध्ये सुमारे 14 कोटी ऊपयांच्या 58 भेटवस्तू मिळाल्या होत्या. या महागड्या भेटवस्तू इम्रान खानने तोशाखान्यातून स्वस्तात विकत घेण्याबरोबरच सरकारी कायद्यात बदलही केले होते.

Advertisement
Tags :

.