योजनांची माहिती करून घेऊन जीवनमान सुधारावे
रवी बंगरेप्पन्नवर : श्रमजीवींच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
बेळगाव : श्रमजीवी व मोलमजुरी करणाऱ्यांनी रोजगार हमी योजनेबरोबरच इतर योजनांची माहिती करून घेऊन नियमितपणे काम मिळवावे व आपले जीवनमान सुधारावे, असे आवाहन जि. पं. चे योजना संचालक रवी बंगरेप्पन्नवर यांनी केले. ग्रामीण विकास-पंचायतराज खाते, जि. पं. बेळगाव, ता. पं. बेळगाव, ग्राम स्वराज्य अभियान, प्रज्ज्वल संस्था बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव तालुक्यातील श्रमजीवींसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन गुरुवार दि. 16 पासून करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन ता. पं. सभागृहात गुरुवारी करण्यात आले. याप्रसंगी बंगरेप्पन्नवर बोलत होते. यावेळी कार्यकारी अधिकारी रमेश हेगडे यांनीही विचार मानले. बेळगाव तालुक्यात एकूण 300 श्रमजीवींना प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे.
यासाठी सात तुकड्या बनविण्यात येणार आहेत. प्रत्येक तुकडीला तीन दिवस याप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिबिराचा श्रमजीवींनी सदुपयोग करून घ्यावा, असे हेगडे म्हणाले. श्रमजीवींनी कामाच्या स्थळावर आपण कशा पद्धतीने काम करावे, याची माहिती प्रशिक्षण शिबिरात मिळवून आपापल्या ग्रा. पं. कार्यक्षेत्रात उत्तमरितीने कार्य करावे, असे आवाहनही हेगडे यांनी केले. साहाय्यक संचालक बी. डी कडेमनी, कर्नाटक सेवा संस्थेच्या प्रमुख वैशाली बळटगी, डीआयइसीचे संयोजक प्रमोद घोडेकर, रमेश मादर, राज्य मास्टर ट्रेनर सुजाता कोरीशेट्टी, एसआयआरडी कुसुमा अवक्कनवर, एडीएम प्रभावती कोलकार तसेच ता. पं. चे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.