तोतया अधिकाऱ्याचा महिलेस 5 लाखांचा गंडा
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला केली अटक
तिसवाडी : गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याचे भासवून काणकोण तालुक्यातील चावडी येथील एका महिलेची 5.03 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली आहे. सुरज पेंडसे उर्फ सिद्धार्थ (रा. आसगाव, मुदुंगो) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने स्वत:ला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याचे भासवत तक्रारदार महिलेला विविध अधिकृत कामे पूर्ण केल्याचा विश्वास दिला. यासाठी त्याने बनावट ‘कन्सेंट लेटर’ तसेच मंडळाच्या खोट्या पावत्या तयार करून महिलेला दाखवल्या.
या बनावट कागदपत्रांवर विश्वास ठेवून संबंधित महिलेने मे ते जुलै 2025 या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांत डिजिटल माध्यमातून आरोपीकडे एकूण 5.03 लाख रुपयांची रक्कम पोचवली. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेने तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला असता तो पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 25 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीला काणकोण येथील प्रथम वर्ग न्यायदंडागिरी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 28 जानेवारी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.
कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातही गुन्हे नोंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज पेंडसे हा 2017 पासून सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गोव्यातील विविध पोलिस स्थानकांमध्ये, गुन्हे शाखा व सायबर गुन्हे विभागात एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातही त्याच्यावर गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.