बेळगाव, कारवार, निपाणीत राष्ट्रपती राजवट लागू करा!
खा. अरविंद सावंत यांची लोकसभेत मागणी
मुंबई : कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी,बिदर या मराठी भाषिक भागातील लोकांना तेथील सरकारतर्पे अन्यायकारक वागणूक दिली जात आहे. तडीपारीची शिक्षा होईल, असे गुन्हे नोंदवले जात आहेत. त्यामुळे कर्नाटकातील मराठी भाषिक भागात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी गुरुवारी लोकसभेत केली. खासदार अरविंद सावंत म्हणाले, महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 साली झाली. त्यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या मराठी बहुभाषिक भागाचा महाराष्ट्रात समावेश झाला नाही म्हणून तेव्हापासून या भागातील मराठी भाषिक लोक आंदोलन करत आहेत. आताही मराठी भाषिक भागावर अन्याय होत आहे. विशेष म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1969 साली आंदोलन केले. त्यावेळीही 69 हुतात्मे झाले. तरीही प्रश्न सुटला नाही.आताही मराठीसाठी प्रयत्न करणाऱ्या शुभम शेळके यांना तडीपार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कर्नाटकात मराठी माणसांवर असेच जुलूम केले जात असतील तर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करताना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे लक्ष वेधून घेतले.