आदिवासी नेत्यांची आज दक्षिणेत महत्त्वाची बैठक
चार ते पाच आमदार उपस्थित राहणार: साऱ्यांच्या बैठकीकडे नजरा
त.भा. विशेष प्रतिनिधी
पणजी : आदिवासींना आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय राखीवता मिळत नसल्याने आदिवासी नेत्यांची आज दुपारनंतर अत्यंत महत्त्वाची बैठक दक्षिण गोव्यात होत असून या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेऊन तो घोषित केला जाण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार आजच्या या आदिवासी नेत्यांच्या बैठकीत चार ते पाच आमदार उपस्थित राहतील. तसेच सुमारे अन्य 60 जण या बैठकीस उपस्थित राहून एक अंतिम निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. दोन ते तीन तास सदर बैठक होईल आणि सर्व आदिवासी एकत्रित येण्याची वज्रमूठ बांधतील, असा अंदाज आहे. आजच्या या बैठकीमध्ये नेमका कोणता महत्त्वाचा निर्णय होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे, मात्र आदिवासी नेते सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर प्रचंड नाराज असून सर्व दबावतंत्रे वापरून काहीही फायदा झाला नसल्याने आता एक मोठा निर्णय घेण्याची तयारी त्यांनी केलेली आहे.
आजच्या या बैठकीत जे काही निर्णय होतील, ते सर्व नेत्यांना लागू राहतील आणि त्यामुळेच समजा या नेत्यांनी भाजपपासून दूर राहा किंवा नाते तोडा असा जर सल्ला दिला तर खरोखरच त्याची अंमलबजावणी करण्यास भाजपचे चारही आमदार तयार होतील का ? असाही एक प्रश्न आहे. किंवा सरकारला काहीतरी ठोस निर्णय घेण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ देतील, असेही असू शकते.
आदिवासी नेते आक्रमक झालेले असून आता सर्वांनी एकच महत्त्वाचा निर्णय घ्यायचा यासाठीच एकत्र येण्याची ही वेळ आलेली आहे, असा संदेश सर्व सदस्यांना पाठवलेला आहे. आजच्या बैठकीत जो काही निर्णय होईल त्याचा गोव्याच्या राजकारणावर निश्चितच गंभीर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आज नेमका काय निर्णय होईल, हे संध्याकाळी बैठकीनंतर जाहीर केले जाणार आहे.
निर्धार
सर्व आदिवासी एकत्रित येण्याची वज्रमूठ बांधण्याची शक्यता
आदिवासी नेते सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवर प्रचंड नाराज
सरकारला ठोस निर्णय घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची शक्यता
गोव्याच्या राजकारणावर निश्चितच होणार गंभीर परिणाम