राजद-काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक
बिहार निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा शक्य
वृत्तसंस्था/ पाटणा
चालू वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीबाबत सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. याचदरम्यान मंगळवार, 15 एप्रिल रोजी दिल्लीत राजद आणि काँग्रेसमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राजद नेते तेजस्वी यादव जागावाटपावर चर्चा करतील. राजद खासदार मनोज झा यांनी सोमवारी ही माहिती दिली.
राजद-काँग्रेसची संयुक्त बैठक खर्गे यांच्या निवासस्थानी होण्याची अपेक्षा आहे. ही एक औपचारिक बैठक आहे. काँग्रेस हा राजदचा आतापर्यंतचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. या औपचारिक बैठकीत संपूर्ण राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाईल, असे राजद खासदार मनोज झा म्हणाले.
सध्या बिहारमध्ये काँग्रेस बरीच सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी बिहारमधील स्थलांतराचा मुद्दा मोठ्याने उपस्थित केला आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी ‘स्थलांतर थांबवा, नोकऱ्या द्या’ अशी रॅलीही काढली. 7 एप्रिल रोजी बेगुसराय येथील या रॅलीत राहुल गांधीही सहभागी झाले होते.
भाजपचीही तयारी सुरू
यापूर्वी, 30 मार्च रोजी बिहारमध्ये पक्षासाठी निवडणूक बिगुल वाजवताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर 1990 ते 2005 दरम्यान ‘जंगल राज’ आणि भ्रष्टाचाराचे नेतृत्व केल्याचा आरोप केला होता. नजिकच्या काळात अमित शहा महिन्यातून दोनदा बिहारचा दौरा करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.