म.ए.समितीच्या कार्यकर्त्यांची आज महत्त्वाची बैठक
शहरातील पोलिंग एजंटची यादी तयार होणार : उत्तर-दक्षिणमधील कार्यकर्त्यांना आवाहन
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : मतदार फेरनिरीक्षण प्रक्रियेसाठी (एसआयआर) राष्ट्रीय पक्षांप्रमाणेच म. ए. समितीच्या प्रतिनिधींना सामावून घेण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी (पोलिंग एजंट) तयार करून प्रशासनाकडे देण्याची सूचना केली होती. यासंदर्भात रविवार दि. 5 रोजी म. ए. समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सायंकाळी 5 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड येथे भव्य बैठक होणार आहे.
सदर बैठकीमध्ये बेळगाव दक्षिण आणि उत्तर भागासाठी मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी म्हणून काम करू इच्छिणाऱ्या आपल्या भागातील कार्यकर्त्यांची यादी सोबत आणावी. तसेच या बैठकीला बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील समिती कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक, ग्रा.पं.सदस्य, जि. पं.सदस्य व मराठी भाषिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे. सीमाभागात मतदार फेरनिरीक्षण प्रक्रियेसाठी (एसआयआर) केवळ कन्नड भाषेतून अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया मराठीतही राबविण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी मनपा आयुक्तांची शुक्रवारी भेट घेण्यात आली. यावेळी बीएलओंसोबत म. ए. समितीचे पोलिंग एजंट सामावून घेण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे यादी द्या, त्या प्रतिनिधींना प्रक्रियेत सामावून घेऊ, असे सांगितले होते.