व्यवसायातील महत्त्वपूर्ण मानवीय पैलू
सद्यस्थितीत व्यावसायिक क्षेत्रात सर्वसाधारणपणे भर दिला जातो तो तंत्रज्ञान विकास, नवीन कार्यपद्धतींसाठी आधुनिक तंत्राचा वापर करून स्पर्धेत केवळ टिकूनच न राहता स्पर्धेवर मात करून अधिकाधिक व्यवसाय, विस्तार व वाढता फायदा मिळविण्यावर. या प्रयत्नांतून आपल्या उद्योग व उद्योजकांनी रोबोटपासून युनिकॉर्म पर्यंतची विविध उद्दिष्टे तर साध्य केली, मात्र यशाचा हा टप्पा गाठताना आपण या प्रयत्नांशी निगडित व महत्त्वाच्या अशा मानवीय पैलूंचा कसा आणि कितपत विचार केला हा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित झाला आहे.
वाढत्या व्यावसायिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर एक प्रभावी उपाय म्हणून अद्ययावत तंत्रज्ञान व विकसित संगणकीय कार्यपद्धती यावर आधारित उद्योग, व्यवसाय प्रक्रियेवर भर देतानाच अनेक ठिकाणी कंपनी आणि कामकाजावर भर देताना कर्मचारी या तेवढ्याच महत्त्वाच्या बिंदूवर प्रसंगी दुर्लक्ष होते का? हा महत्त्वपूर्ण प्रश्न यानिमित्ताने उद्योग-व्यवसाय क्षेत्रात निर्माण होतो. त्यातही पण व्यावसायिक संदर्भात मानवीय मुद्दा म्हणून कर्मचाऱ्यांना हाताळताना अथवा त्यांच्याशी संबंधित छोट्या-मोठ्या मुद्यांचा विचार करून निर्णय घेताना भावनात्मक पैलू बाजुला सारला जाण्याची उदाहरणे बहुसंख्य ठिकाणी घडत असतात. परिणामी उद्योग-व्यवसाय व त्यातील प्रगतीसाठी कर्मचाऱ्यांशी भावनिक पद्धतीने व परिस्थितीनुरुप वागण्याची पद्धत व्यवस्थापन आणि व्यवस्थापक या उभयतांकडून दुर्लक्षिली जात आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रात व व्यवस्थापन कार्यपद्धतीच्या संदर्भात व्यवस्थापकीय संकल्पनेला अधिक प्रभावी व उपयुक्त सिद्ध करण्यासाठी व्यवस्थापकीय शिस्तीला कर्मचाऱ्यांचे सामंजस्य व उभयतांमध्ये समान भावना असणे प्रत्येक उद्योग व्यवसायाच्या यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक असते. उद्योग, व्यवसाय चक्रातील तंत्रज्ञान-व्यवसाय प्रक्रिया, संबंधित कार्यपद्धती, आर्थिक पाठबळ, व्यावसायिक वाढ, उत्पादन व सेवा यांचा दर्जा व व्यवसायाची गुणवत्ता या सर्व व प्रमुख कार्य टप्प्यांमध्ये कर्मचारी हा एक समान मुद्दा असतोच असतो.
कंपनीच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील व व्यावहारिकच नव्हे प्रत्यक्षात विविध बाबी स्वाभाविकपणे अनुभवायला येतात. यामध्ये प्रामुख्याने कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची निवड, कामावर रुजू होणे, प्रत्यक्ष कामकाज, कामाचे वार्षिक नियोजन व अवलोकन संबंधित कर्मचाऱ्याच्या कामाचा दर्जा व त्यांचे होणारे व्यावहारिक -व्यावसायिक परिणाम, कर्मचाऱ्याच्या व्यक्तिगत क्षमतेचे कार्यक्षमतेत होणारे रुपांतर, व्यक्तीच्या कामाच्या परिणामांनुरुप त्यांची होणारी पदोन्नती व पगारवाढ, कंपनीतर्फे दिले जाणारे शिक्षण-प्रशिक्षण व कर्मचाऱ्यांच्या विकासात्मक स्वरुपात केले जाणारे प्रयत्न इ. चा समावेश असतो. ही प्रक्रिया कर्मचारी संबंधित आस्थापनेत कामावर असताना व त्यांच्या सेवा काळात निरंतर चालू असते. म्हणूनच विशेषत: एचआर-व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून याला ‘कर्मचाऱ्याचे सेवा चक्र’, `Employe Life Cycle' असे म्हटले जाते. यातील विविध टप्प्यांवर कंपनी आणि कर्मचाऱ्यांनी काय प्रयत्न केले व त्यांचा काय परिणाम झाला याचा वेळोवेळी व नियोजनबद्ध पद्धतीने विचार करणे परस्पर फायदेशीर ठरू शकते.
याचाच एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांचे नियोजन व व्यवस्थापन हे मुद्दे सुद्धा महत्त्वाचे ठरतात. मुळातच कर्मचारी व त्यांच्याशी संबंधित विविध मुद्दे हे जिव्हाळ्याचे व प्रसंगी ज्वलंत ठरू शकतात. या बाबींचा उद्योग क्षेत्रात बऱ्याचदा अनुभव येतो. यातूनच कंपनी-कर्मचाऱ्यांचे परस्पर दुराग्रहृ शिस्त पालन, अपेक्षांची पूर्तता, नाराजी वा असंतोष व काही वेळा कर्मचारी संघटनांची सक्रियता दिसून येते. या आणि अशा प्रकारच्या स्थिती-परिस्थितीचा अंदाज-मागोवा घेणे, त्यावर संवाद साधून उपाययोजना करणे, मुख्य व जिव्हाळ्याच्या मुद्यांचे निराकरण करणे परस्पर संबंधांना सकारात्मकतेची जोड देणे इ. प्रकारची उपाययोजना कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त व कंपनीसाठी फायदेशीर ठरते.
कंपनी-व्यवस्थापनात शिस्तपालन हा मुद्दा सर्वच स्तरांवर व विविध प्रकारे महत्त्वाचा ठरतो. या प्रयत्नांचा आधार केवळ अधिकार-भय व पदभार न राखता संवादावर आधारित शिस्त ठेवणे व्यवस्थापन कार्यपद्धतीत महत्त्वाचे ठरते. भीतीपोटी आलेली वा असणारी शिस्त व्यक्तीच्या भीतीप्रमाणेच अल्पकालीन ठरते. त्याचे प्रसंगी विपरित परिणाम होता वरिष्ठ कनिष्ठांमधील दैनंदिन कामाशी निगडित व आवश्यक असणारे संबंध बिघडू शकतात. याचा उलट परिणाम व्यक्ती व संस्था या उभयतांवर होत जातो. त्यावर कंपनी, कर्मचारी उभयतांनी परस्पर जबाबदारी ओळखून ती निरंतर पार पाडणे यासारख्या मुद्यावर व्यावहारिक उपचार करणे आवश्यक असते.
या दरम्यान कंपनी-कर्मचारी व व्यवस्थापन: व्यवस्थापक यांच्यातील नेतृत्वगुणांचा बऱ्याचदा कस लागतो तर कधी परीक्षा पण होते. विशेषत: ज्या उद्योग आस्थापनांमध्ये कामगार संघटना सक्रियपणे कार्यरत असते त्याठिकाणी याचा प्रत्यय अधिक प्रकर्षाने येतो. या नेतृत्वाला प्रसंगानुरुप जबाबदारीची साथ देणे व उभयपक्षी आपापली जबाबदारी परस्परपूरक व उद्योगाच्या व्यापक हितासाठी विचारपूर्वक वापरणे महत्त्वाचे ठरते. यासाठी प्रामुख्याने प्रयत्नपूर्वक-प्रामाणिकपणे व दीर्घकालीन प्रयत्न मात्र आवश्यक आहेत. व्यवस्थापनांतर्गत हा मुद्दा म्हणूनच संवेदनशीलच नव्हे तर महत्त्वपूर्ण ठरतो. कामाच्या ठिकाणी व कामावर काम करताना व्यक्तिगत स्तरावर कंपनी-कर्मचारी या उद्योग-व्यवसायातील महत्त्वपूर्ण व व्यक्तिगत व्यवहारांवर आधारित स्वरुपाचे काम करताना परस्पर भावनांची दखल घेत विविध मुद्यांवर परस्पर जाणिवांसह काम करणे सर्व संबंधितांसाठी महत्त्वाचे ठरते.
व्यावसायिक संदर्भात परस्पर व्यवहारांच्या भावनात्मक साथीची नितांत व वाढती गरज व्यवस्थापन क्षेत्रात नव्यानेच अधोरेखित करण्यात आली असून त्या दृष्टीने पुढील मुद्दे महत्त्वाचे व कंपनी-कर्मचारी या उभयतांसाठी उपयुक्त असल्याचे नमूद केले आहेत.
परस्पर भावनांची जाणीव : व्यावसायिक व व्यवस्थापनपर संदर्भात होणारे विचार-व्यवहारांमधील मानवीय भावनांचा पडताळा घेणे.
व्यक्तिगत भावनांची दखल : परस्पर संपर्क, संवाद निर्णय व त्यामागील संबंधित घटकांच्या-व्यक्तींच्या भावना व त्यांची पार्श्वभूमी जाणून घेणे. अडचणी समजून घेणे : कंपनी, कंपनीचे कामकाजच नव्हे तर त्यासंदर्भातील परस्पर अडचणी समजून घेऊन त्यावर यथावत तोडगा काढणे. कंपनीची काळजी घेण्यासाठी कार्यक्षम कर्मचाऱ्यांना राखून ठेवणे : कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर कंपनी-व्यवस्थापनाची कार्यक्षमता अवलंबून असते. त्यामुळे कंपनीसंदर्भात सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे कंपनीमध्ये कर्मचारी तर महत्त्वाचे असतातच, मात्र कार्यक्षम कर्मचारी अधिक महत्त्वाचे असतात, हे तत्व व्यवस्थापन व व्यवस्थापकांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवावे.
नेतृत्व व प्रभावी निर्णय क्षमता : व्यवस्थापनाचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ म्हणून आपली नेतृत्व निर्णयाची भूमिका पार पाडताना सातत्याने भावनाधीन होऊन निर्णय न घेता भावनाशील बनून निर्णय घ्यावेत. कारण असे निर्णय प्रभावी ठरत असतात. यासंदर्भात थोडक्यात व महत्त्वाचे म्हणजे व्यवस्थापन प्रक्रियेत व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी परस्परांना गरजेनुरुप आवश्यक असणारा ‘पासवर्ड’ समजण्याची मानसिकता कायमची ‘डिलीट’ करणेच उभयतांसाठी आवश्यक आहे.
दत्तात्रय आंबुलकर