एक-दोन महिन्यात राज्य भाजमध्ये महत्त्वाचे बदल
आमदार रमेश जारकीहोळी यांचा गौप्यस्फोट
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य भाजपच्या नेतृत्त्वाला पुन्हा विरोध होत असून बी. वाय. विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्याची कसरत सुरू आहे. मागील काही आठवड्यांपूर्वी उत्तर कर्नाटकातील काही नेत्यांनी बैठक घेत भाजप हायकमांडला आपली भूमिका कळविली होती. दरम्यान, डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात राज्य भाजपमध्ये महत्त्वाचे बदल होतील, असा गौप्यस्फोट आमदार रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.
रायचूर येथे सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. विजयेंद्र प्रदेशाध्यक्षपदी असेपर्यंत मी प्रचाराला जाणार नाही. विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वीकारलेले नाही, स्वीकारणारही नाही. त्यांच्या पदावरील कामाला मी विरोध केलेला नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंबंधी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. उघडपणे काही मुद्दे मी मांडू शकत नाही. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये काहीतरी निर्णय होईल, असा गौप्यस्फोट आमदार रमेश जारकीहोळी यांनी केला.
विजयेंद्र यांच्या कार्यपद्धतीमुळे मी समाधानी नाही. विजयेंद्र प्रदेशाध्यक्ष बनले तेव्हा लोकसभेची निवडणूक होती. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी सर्वकाही विसरून काम केले होते. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर वरिष्ठांना सर्वकाही सांगितले आहे. पुढील एक-दोन महिन्यात काहीतरी निर्णय होईल, अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.
बेळगावमध्ये आम्ही दहा-बारा जणांनी बैठक घेतली आहे. पक्षाच्या चौकटीत राहून काम सुरु केले आहे. यामध्ये गैरअर्थ काढण्यासारखे काहीही नाही. बेंगळूरमधील बैठकीत थेट काय सांगायचे आहे, ते सांगितले आहे. डिसेंबरपर्यंत सर्वकाही योग्य होईल. पुढे केव्हा निवडणूक होईल हे माहित नाही. ज्यावेळी निवडणूक होईल तेव्हा पक्ष सत्तेवर आला पाहिजे. 130-140 जागा मिळविण्यासाठी टीम तयार करून कामाला सुरुवात केली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळायला हवा म्हणून टीम बनविली आहे. काँग्रेसमध्ये पाच वेळा आमदार बनलो आहे. भाजपमधून दोन वेळा आमदार बनलो आहे. यत्नाळ, जारकीहोळी हे एक-दोघे नव्हे. सामूहिक नेतृत्त्व हवे आहे, असेही ते म्हणाले.