जपान आणि अमेरिकेत महत्वाचे करार
दुर्मिळ खनिजद्रव्ये आणि इतर साधनांचा समावेश
वृत्तसंस्था / टोकियो
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या जपान दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार झाले असून त्यांच्यात दुर्मिळ खनिजद्रव्यांच्या खरेदी-विक्रीसंबंधी कराराचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील व्यापारसंबंध अधिक बळकट केले जाणार आहेत. ट्रंप यांनी या करारांचे वर्णन ‘नवे सुवर्णयुग’ असे केले आहे.
अमेरिका आणि जपान हे दोन्ही देश मोठ्या प्रमाणात दुर्मिळ खनिजांवर अवलंबून आहेत. सध्या चीनचे या व्यापारावर एकहाती वर्चस्व असून जगाच्या आवश्यकतेच्या एकंदर 70 टक्के द्रव्ये चीन पुरवितो. चीनने पुरवठा कमी केल्यास किंवा रोखल्यास जपान आणि अमेरिका हे दोन्ही देश अडचणीत येतात. त्यामुळे या द्रव्यांचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी आता दोन्ही देश संयुक्तरित्या प्रयत्न करणार असून या संबंधात एक दबावगट बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मलेशिया आणि थायलंडशीही करार
ट्रंप यांच्या आशिया दौऱ्यात थायलंड आणि मलेशिया या देशांशीही त्यांनी दुर्मिळ खनिजांसंबंधीचा करार केला आहे. अमेरिका या द्रव्यांसंबंधात चीनवरचे अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अमेरिका विविध देशांशी अशा प्रकारचे करार करुन या द्रव्यांवरचा चीनचा एकाधिकार सौम्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
ताकाईची यांच्याशी भेट
जपान दौऱ्यात डोनाल्ड ट्रंप यांनी जपानच्या नव्या नेत्या साने ताकाईची यांची भेट घेऊन चर्चा केली. ताकाईची यांची ही प्रथमच आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय शिखर चर्चा होती. या चर्चेत दोन्ही देशांनी व्यापारी आणि संरक्षणविषयक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय केल्याची माहिती देण्यात आली. संरक्षणासाठी आजही जपान अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये जपानने स्वत:ची संरक्षणसिद्धता वाढविली आहे. दोन्ही देश येत्या काही वर्षांमध्ये आपला परस्पर व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत.
नोबेल पारितोषिकासाठी नामांकन
जागतिक शांततेचे नोबेल पारितोषिक अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांना मिळावे, अशी जपानची इच्छा असल्याचे ताकाईची यांनी स्पष्ट केले आहे. पुढच्या वर्षीचे शांतता नोबेल पारितोषिक ट्रंप यांना देण्यात यावे अशी सूचना ताकाईची यांनी जपानच्या वतीने नोबेल पुरस्कार समितीला करण्याचा निर्णय घेतला आहे.