भारत-इंडोनेशियामध्ये महत्वाचे करार
अध्यक्ष सुबियांतो भारत दौऱ्यावर, गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि इंडोनेशिया यांनी परस्पर संबंध दृढ करण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो भारताच्या दौऱ्यावर आलेले असून दोन्ही देशांमध्ये शनिवारी महत्वाच्या मुद्द्यांवर अनेक करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुबियांतो यांनी एकमेकांशी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली. सुबियांतो आज रविवारी होणाऱ्या गणतंत्रदिन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत.
दोन्ही देशांमध्ये आरोग्य, संरक्षण, सागरी सुरक्षा, संस्कृती आणि डिजिटल स्पेस आदी विषयांच्या संदर्भात सहकार्य वाढविण्यासाठी व्यापक करार करण्यात आले आहेत. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात ऐतिहासिक काळापासून संबंध असून दोन्ही देशांचे ध्येये समान आहेत. भारत-प्रशांतीय क्षेत्र व्यापार आणि संचारासाठी मुक्त रहावे, हे दोन्ही देशांचे धोरण असून त्यासाठी दोन्ही देश एकमेकांशी सहकार्य करण्यास सज्ज आहेत, अशी भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
चीनचे आव्हान
दक्षिण चीन समुद्र आणि भारत-प्रशांतीय क्षेत्र येथे चीनचा वाढता वावर आणि विस्तारवाद ही आव्हाने या क्षेत्रातील सर्व देशांसमोर आहेत. त्यामुळे या सर्व देशांमध्ये सहकार्य असण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने भारत आणि इंडोनेशियामध्ये झालेले करार महत्वाचे मानण्यात येत आहेत. इंडोनेशिया हा भारताचा आर्थिक आणि सामरिक क्षेत्रात महत्वाचा भागीदार देश आहे. दोन्ही देश त्यांच्या सागरी क्षेत्रांमध्ये शांतता आणि संचार स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध आहेत, अशी माहिती दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर देण्यात आली आहे.
पूर्वेकडे पहा, हे धोरण
भारताच्या पूर्वेकडे पहा या धोरणात इंडोनेशियाचे स्थान महत्वाचे आहे. भारताचे या देशाशी ऐsतिहासिक काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. आता दोन्ही देश सामरिकदृष्ट्याही एकमेकांच्या नजीक येत असून संरक्षण साधनांचे सहउपत्पादन आणि पुरवठा साखळ्या सुनिश्चित करण्यात दोन्ही देश पुढाकार घेत आहेत. या क्षेत्रात सहकार्य अधिक वाढविण्यासाठी दोन्ही देशांनी अनेक योजनांवर एकत्रित कार्य करण्यास प्रारंभ केला आहे. सायबर सुरक्षेवरही सहकार्य केले जात आहे.
दहशतवाद संपविण्यावर एकमत
धार्मिक कट्टरता आणि तिच्यातून निर्माण होणारा दहशतवाद हे जगासमोरचे सर्वात मोठे संकट आहे. भारत आणि इंडोनेशिया हे दोन्ही देश कोणत्याही प्रकारच्या आणि कोणत्याही कारणांसाठी असलेल्या दहशतवादाच्या विरोधात आहेत. त्यामुळे दहशतवादाचे संकट संपविण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही करारांवर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर देण्यात आली.
परस्पर व्यापारात वाढ
गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील परस्पर व्यापारात भरीव वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांनी एकमेकांशी एकंदर 30 अब्ज डॉलर्सचा व्यापार केला. या व्यापाराची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी एकमेकांशी झालेल्या चर्चेत घेतला आहे.
रामायणाची परंपरा
इंडोनेशिया देशात भगवान रामाचे महत्व अनन्यसाधारण आहे. इतिहासकाळापासून येथे रामायणाची परंपरा आहे. महाभारत या ऐतिहासिक गंथालाही येथे मोठे महत्व आहे. या देशातील जगप्रसिद्ध बाली बेटांवर आजही प्राचीन हिंदू संस्कृतीचे दर्शन घडते. या देशातील ‘बाली जत्रा’ आणि रामायण उत्सव हे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक जवळीकीची महत्वाची प्रतीके मानली जातात.
दृढ सहकार्याच्या दिशेने
ड भारत आणि इंडोनेशियामध्ये भविष्यकाळात संरक्षण सहकार्य वाढणार
ड सायबर सुरक्षा, प्रशांत-भारतीय सागरी क्षेत्र यासंबंधी व्यापक वाटाघाटी
ड आर्थिक सहकार्य आणि व्यापारात गेल्या 10 वर्षांमध्ये झाली मोठी वाढ
ड भारत आणि इंडोनेशिया यांच्यात प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंध